*कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडावमध्ये रक्तदान शिबिर व वारकऱ्यांचा सन्मान

*कोंकण एक्सप्रेस
*कै. सत्यविजय भिसे यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडावमध्ये रक्तदान शिबिर व वारकऱ्यांचा सन्मान
*१५० हून अधिक वारकऱ्यांचा सन्मान; ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
*माजी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती
*कणकवली : प्रतिनिधी
कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळ, शिवडाव यांच्या वतीने कै. सत्यविजय भिसे यांच्या २४व्या स्मृतिदिनानिमित्त रविवार, २२ नोव्हेंबर रोजी शिवडाव येथील राऊतखोलवाडीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते कै. सत्यविजय भिसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर वारकरी संप्रदायातील १५० हून अधिक मंडळींचा सन्मान करण्यात आला.
कै. सत्यविजय भिसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा मित्रमंडळ व भिसे कुटुंबीयांनी जपली आहे. रक्तदान शिबिर, वारकरी संप्रदायाचा सन्मान, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम अशा माध्यमातून कै. सत्यविजय भिसे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी वारकरी संप्रदायाच्या भजन आणि भक्तिमय वातावरणात स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला माजी खासदार विनायक राऊत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा भिसे, तालुकाप्रमुख राजू राठोड, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, सोमा घाडीगावकर, शिवडाव सरपंच नितीश भिसे, उपसरपंच सायली तेली, माजी सरपंच सुनीता जाधव, माजी उपसरपंच लवू वाळके, कळसुली विभागप्रमुख बबली राणे, तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ गावकर, ग्रामपंचायत सदस्य वैशाली पाटील, चंदू शिरसाठ, नितीन हरमळकर, मिथिल गावकर, महेश शिरसाठ, मधुकर चव्हाण, नितीन गावकर, निलेश दळवी, रामचंद्र करगुटकर, दीपक कोरगावकर, श्रीकांत तेली, सुनील हरमळकर, प्रेमानंद कोरगावकर, गणेश शिवडावकर, मिलिंद काणेकर, निकेतन भिसे, विश्वनाथ गवडळकर, दयानंद कोदे, विजय सुतार,यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कै. सत्यविजय भिसे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, सत्यविजय भिसे यांच्या दुर्दैवी घटनेनंतरही भिसे कुटुंबीयांनी सामाजिक कार्याचा वारसा सोडला नाही. गेल्या २४ वर्षांपासून स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर आणि वारकरी संप्रदायाचा सन्मान असे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. राजकीय क्षेत्रात अनेकदा व्यासपीठावरील माणसे बदलतात, मात्र सामाजिक कार्याची परंपरा टिकवून ठेवणे ही मोठी गोष्ट आहे.
सत्यविजय भिसे हे अत्यंत कष्टाळू आणि उद्योजकीय वृत्तीचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कष्टातून त्यांनी उद्योग क्षेत्रात भरारी घेण्यास सुरुवात केली होती. ते आज असते तर मोठे उद्योजक झाले असते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुर्दैवी घटना घडली, मात्र भिसे कुटुंबीयांनी हार न मानता सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य सुरू ठेवले. ज्यांनी कुटुंबाला मोठे केले, त्यांच्याकडून झालेल्या अन्यायाची कटुता मनात न ठेवता सामाजिक कार्यात सातत्य राखणे, ही भिसे कुटुंबीयांची मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुशांत नाईक : स्मृतिदिन म्हणजे चांगल्या प्रवृत्तीचा जागर
कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले की, २४ वर्षांपूर्वी घडलेली घटना आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्या काळातील राजकीय परिस्थिती, आंदोलनाची तीव्रता आणि समाजातील भावना आजही विसरता येत नाहीत. स्मृतिदिनाच्या माध्यमातून सत्यविजय भिसे यांच्या कार्याची आठवण जिवंत ठेवण्याचे काम मित्रमंडळ आणि भिसे कुटुंबीय करत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिर, वारकरी संप्रदायाचा सन्मान, महिला सन्मान अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन होत आहे. वारकरी संप्रदायाच्या भजनातून चांगल्या प्रवृत्तीचा जागर केला जातो. शिवडाव गावचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील लोक राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या विचारांचे असले तरी स्मृतिदिनाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. गावाच्या एकजुटीची आणि सामाजिक बांधिलकीची ही परंपरा कायम राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी खासदार विनायक राऊत : सत्यविजय भिसे यांच्या सामाजिक कार्याची ज्योत नव्या पिढीपर्यंत पोहोचावी
माजी खासदार विनायक राऊत यांनी कै. सत्यविजय भिसे यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करताना त्यांच्या परोपकारी वृत्तीचा गौरव केला. २४ वर्षांपूर्वी जिल्ह्यात राजकीय गुंडगिरी आणि दहशतीचे वातावरण होते. समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राजकीय स्वार्थातून लक्ष्य केले जात असल्याचे चित्र त्या काळात होते. अशा परिस्थितीत अन्यायाविरोधात सिंधुदुर्गातील जनतेने एकजुटीने आवाज उठविला.
सत्यविजय भिसे हे हसतमुख, खेळकर आणि समाजासाठी धावून जाणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतरही बाळा भिसे यांनी कुटुंबाला आधार दिला आणि सामाजिक कार्याचा वारसा कायम ठेवला. आज स्मृतिदिनाच्या माध्यमातून सत्यविजय भिसे यांच्या सामाजिक कार्याची, परोपकारी वृत्तीची आणि जनतेशी असलेल्या नात्याची आठवण जिवंत ठेवली जात आहे. नव्या पिढीला सत्यविजय भिसे कोण होते आणि त्यांनी समाजासाठी काय केले, हे सांगण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या स्मृतिदिनाच्या माध्यमातून होत असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.
सत्यविजय भिसे हे स्पष्टवक्ते, निर्भीड आणि अन्यायाविरोधात ठाम
भूमिका घेणारे व्यक्तिमत्त्व होते. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि समाजासाठी स्वतःचा त्याग करणे, हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या निधनाने समाजाने एक चांगला कार्यकर्ता गमावला.
आज शिवडाव गावातील जनतेने भिसे कुटुंबाशी असलेली नाळ कायम जपली आहे. गावातील लोक वेगवेगळ्या राजकीय पक्षांत असले तरी स्मृतिदिनाच्या निमित्ताने एकत्र येतात, ही गावाची मोठी ताकद आहे. २४ वर्षे सातत्याने स्मृतिदिन साजरा करणे ही सहजसाध्य गोष्ट नाही. रक्तदान शिबिर, वारकरी संप्रदायाचा सन्मान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून सत्यविजय भिसे यांच्या कार्याची ज्योत पुढे नेली जात आहे. समाजात निस्वार्थीपणे काम करण्याची प्रेरणा या स्मृतिदिनातून मिळत असल्याचे संदेश पारकर यांनी नमूद केले.
कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळ आणि भिसे कुटुंबीयांच्या वतीने आयोजित या स्मृतिदिन कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी, गावाची एकजूट, रक्तदानाचे महत्त्व आणि वारकरी संप्रदायाचा सन्मान यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. २४ वर्षांनंतरही कै. सत्यविजय भिसे यांच्या स्मृती समाजमनात जिवंत असून त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
जाहिरात



