*सिंधुदुर्गात शासकीय रुग्णालयांमध्ये उत्कृष्ट वैद्यकीय सेवा; तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे राजू मसुरकर यांच्याकडून अभिनंदन**सावंतवाडी : संजना हळदिवे*
गेल्या तीन महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध शस्त्रक्रिया व वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडून रुग्णांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांसह जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. गिरीश चौगुले (जनरल सर्जन), डॉ. धीरज सावंत (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. भक्ती सावंत (स्त्रीरोगतज्ज्ञ) आणि डॉ. अंजना पी. (स्त्रीरोगतज्ज्ञ) यांच्यासह विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांवर यशस्वीपणे उपचार व शस्त्रक्रिया करून गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे.
तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्ह्यातील विविध शासकीय तालुका रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मसुरकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्यानंद यांच्यासह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, ऑपरेशन थिएटरमध्ये कार्यरत आरोग्य कर्मचारी तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांतील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.

गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना शासकीय रुग्णालयातून दर्जेदार उपचार मिळणे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे, असे राजू मसुरकर यांनी सांगितले.
“डॉक्टर आणि सर्व आरोग्य कर्मचारी यापुढेही अशीच निस्वार्थ व ईश्वरी सेवा गोरगरीब जनतेला देत राहोत. ईश्वराने सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समाधान, ऐश्वर्य व समृद्धी प्रदान करावी,” अशी प्रार्थना जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केली.

