*कोंकण एक्सप्रेस*
*वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरट्यांनी लांबविली*
*शिरगाव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील शिरगाव बाजारपेठ येथे एसटीतून प्रवास करताना वयोवृद्ध महिलेची १५ ग्रॅमची सोन्याची माळ अज्ञात चोरट्याने लांबविली. ही घटना २६ ऑगस्ट रोजी स.११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
कुवळे आगरवाडी येथील सुलोचना सदाशिव लाड (वय ७०) या औषध उपचारासाठी शिरगाव येथे आल्या होत्या. सकाळी ११.३० ते ११.४५ वाजण्याच्या दरम्यान शिरगाव सांडवे मार्गे कणकवली एसटी बसने घरी परतत असताना एसटी बसमध्ये चढताना किंवा प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्याने आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन तिच्या गळ्यातील पंधरा ग्रॅमची सोन्याची माळ लांबविली. याबाबतची माहिती देवगड पोलिस ठाण्याला कळताच पोलिस निरीक्षक शाम बुवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सुलोचना लाड यांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार मनोज राऊत करीत आहेत.

