देवजी ट्रस्टतर्फे विद्यार्थी गुणगौरव

देवजी ट्रस्टतर्फे विद्यार्थी गुणगौरव

*कोंकण एक्सप्रेस*

*देवजी ट्रस्टतर्फे विद्यार्थी गुणगौरव*
*वेंगुर्ला प्रतिनिधी -प्रथमेश गुरव*
आपल्या जन्मदात्रीच्या स्मरणार्थ भावी पिढीला शिक्षित करण्यासाठी मदत करणे ही सुद्धा एक ईश्वर सेवा आहे. समाजभान राखून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रासाठी लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सुरू असलेले उपक्रम समाजाला दिशादर्शक आहेत. ट्रस्टतर्फे देण्यात आलेली बक्षीसरूपी भेट स्वीकारताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले. रामचंद्र देवजी यांनी आपल्या आईसाठी ही खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली, असे प्रतिपादन नगराध्यक्ष गिरप यांनी केले.
शालेय विद्यार्थी व युवा वर्गाच्या शैक्षणिक विकासासाठी स्थापन झालेल्या लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उभादांडा येथील केपादेवी शाळा नं. ४ मध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष दिलीप गिरप, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे सचिव तथा पत्रकार महेंद्र मातोंडकर, ज्येष्ठ कीर्तनकार सावळाराम कुर्ले, सामाजिक कार्यकर्ते रमाकांत गिरप, गाबीत माणूस युट्युब चॅनेलचे मोहित गिरप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भानुदास कांबली, केपादेवी शाळेचे मुख्याध्यापक शंकर जाधव, उभादांडा शाळा नं. ३ चे मुख्याध्यापक खानोलकर, सिंधुदुर्ग श्री शरीरशौष्टव विजेते अमोल तांडेल, लक्ष्मी देवजी ट्रस्टचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र गिरप, संस्थापक रामचंद्र देवजी, वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या कॉन्टेबल वैदेही जाधव, तसेच राजन कुर्ले, दयानंद पराडकर, काजल पराडकर, काजल रेवणकर, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.
आपण मोठे झाल्यावर आपल्या मागे उरलेल्या समाजाकडे दातृत्व भावनेने पाहणाऱ्यांची संख्या आता कमी होत आहे. रामचंद्र देवजी यांना पोलीस खात्यातच नोकरी करायची होती. त्यासाठी त्यांनी कॉलेज जीवनापासूनच तयारी केली होती. शरीर बलवान होण्यासाठी व्यायामशाळेचा आधार घेत त्यांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केले. हेच उदाहरण आजच्या विद्यार्थ्यांनी अंगी बाळगायला हवे. पंखात ऊर्जा असेल तर कोणतेही आभाळ दूर नाही आणि जिद्दीला परिश्रमांची जोड मिळाली तर कोणतेही यश आपल्यापासून दूर राहू शकत नाही. विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमातून बोध घेऊन आपणही मोठे व्हावे व आपल्यामागे उरलेल्या समाजाकडे दातृत्व नजरेने पहावे, असे महेंद्र मातोंडकर म्हणाले.
ट्रस्टच्यावतीने भविष्ययात विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करून शालेय विद्यार्थी तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व त्याची तयारी कशी करावी, याबाबत  तज्ज्ञ मार्गदर्शकांची कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस रामचंद्र देवजी यांनी व्यक्त केला. स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे व्हावेत यासाठी समुद्र किनारपट्टीवर स्वछता मोहीम राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले. गावातील पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण यावेळी ट्रस्टच्यावतीने करण्यात आले. सूत्रसंचालन दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!