मायनिंग व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात गाव एकवटला

मायनिंग व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात गाव एकवटला

*कोंकण एक्सप्रेस*

*मायनिंग व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात गाव एकवटला*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

वेंगुर्ला तालुक्यातील पाल गावात पर्यावरण, शेती, जलस्त्रोत व ग्रामहितास बाधा आणणाऱ्या मायनींग सदृश्य विध्वंसक प्रकल्पाना तसेच गावातील जमिनींचे संरक्षण करणारा व परप्रांतीयांना जमिनी न विकणारा असे महत्वाचे ठाम व एकमुखी विरोध दर्शवणारे ठराव मंगळवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आले. या ग्रामसभेत गावातील ग्रामस्थांची मोठी एकजूट पाहायला मिळाली. या ग्रामसभेला ३३४ ग्रामस्थांचा जनसमुदाय उपस्थित होता.
पाल गावात तसेच पंचक्रोशीत मायनींग सदृश्य काही प्रकल्प येत असल्याची कुणकुण लागल्याने गावातील युवकांनी एकत्र येत विनाशकारी प्रकल्पनांना जोरदार विरोध करण्याचा निश्चय केला. याबाबत मायनिंग व इतर विनाशकारी प्रकल्पनांना ठाम विरोध करण्याचा निर्णय घेऊन तसेच गावातील जमिनींचे संरक्षण करण्याबाबत पाल गावात २० जुलै रोजी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सरपंच कावेरी गावडे, पंचायत अधिकारी अमर गाडेकर, तलाठी गौतम सुतार, कोकणी रानमाणुस प्रसाद गावडे, उपसरपंच प्रीती गावडे, ग्रा.प.सदस्य विनिता गावडे, प्रदीप मुळीक, श्रीकांत गावडे, स्नेहल पालकर, शामली केरकर, ग्रामस्थ भाऊ गावडे, बाळा नागझरकार, प्रसाद गावडे, अंकुश गावडे, अनिल गावडे, सुचिता नाईक, प्रतिभा गावडे आदी उपस्थित होते.
या ग्रामसभेत महत्वाचे तीन ठराव घेण्यात आले. यात गावाच्या पर्यावरण, शेती व नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी वनसंपदा, वन्यजीव, देवस्थाने, सांस्कृतिक वारसा, पर्यटन क्षमता तसेच गावातील शेती, बागायती, जलस्रोत, नद्या, ओढे, विहिरी, जैवविविधता ग्रामस्थांचे आरोग्य, उपजीविका व भावी पिढ्यांचे हित लक्षात घेऊन गावाच्या मायनिंग (खनन), दगडखाण, क्रशर खनिज उत्खनन, खनिज प्रक्रिया उद्योग, रेड हद्दीत अथवा गावाच्या परिसरात प्रस्तावित किंवा भविष्यात प्रस्तावित होणाऱ्या कॅटेगरी प्रक्षणकारी उद्योग, मोठे औद्योगिक प्रकल्प, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, धोकादायक रासायनिक उद्योग तसेच पर्यावरण, शेती, जलस्रोत व ग्रामहितास बाधा आणणाऱ्या कोणत्याही विध्वंसक प्रकल्पांना ग्रामसभेचा ठाम व एकमुखी विरोध दर्शविणारा ठराव मंजुर करण्यात यावा. तसेच अशा कोणत्याही प्रकल्पासाठी ग्रामपंचायत, ग्रामसभा किंवा इतर कोणत्याही स्थानिक संस्थेकडून कोणतीही शिफारस, ना हरकत प्रमाणपत्र, संमती अथवा समर्थन देण्यात येऊ नये तसेच संबंधित सर्व शासकीय विभागांना ग्रामसभेच्या विरोधाची माहिती कळविण्यात यावी असा ठराव ग्रामस्थ तथा उद्योजक अंकुश प्रभाकर गावडे यांनी मांडला याला ग्रामस्थ राजाराम धोंडू गावडे यांनी अनुमोदन दिले.
तसेच गावातील जमिनींचे संरक्षण करणे व वापर करणेबाबत गावातील शेती व इतर जमिनी शक्यतो गावातील व्यक्तींच्या रक्ताच्या नात्यातील वारसदारांना व त्यांच्या भावकितील भाऊबंध तसेच गावाती मूळ रहिवासी व मूळ शेतकरी यांनाच विकाव्यात. गावाबाहेरील व्यक्ती व गावाबाहेरील संस्था, प्रायव्हेट कंपनी, सोसायटी, सहकारी संस्था, संघटना, विकासक, बिल्डर किंवा इतर कोणत्याही व्यावसायिक अथवा कायदेशीर संस्थेला जमिनीची विक्री तसेच भाडेतत्वावर देणे देखील टाळावे. शेती व्यतिरिक्त त्या जमिनीचा वापर केवळ निवासी उद्देशासाठी किंवा पर्यावरणपूरक पर्यटन, कृषी पर्यटन अथवा पर्यावरणपूरक व कृषि पूरक व्यवसायाकरिताच करण्यात यावा. गावाबाहेरील व्यक्ती, संस्था, कंपनी किंवा इतर कोणत्याही घटकाने खरेदी केलेली जमीन भविष्यात विकण्याची वेळ आल्यास ती जमीन प्रथम गावातील व्यक्तींनाच व शेतक-यांनाच विकण्यास प्राधान्य देण्यात यावे असा ठराव भाऊ गावडे यांनी मांडला याला अनिल जगन्नाथ गावडे यांनी अनुमोदन दिले.
तर तिसरा ठराव गावाच्या पर्यावरण, शेती व नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणेबाबत व गावातील जमिनींचे संरक्षण करणे व वापर करणेबाबत वरील दोन्ही विषयांचे ठराव नकारार्थी पद्धदतीने रद्द करावयाचे असल्यास भविष्यात त्या प्रसंगी अशाच प्रकारे विशेष ग्रामसभा आयोजित करून त्या ग्रामसभेची उपस्थिती ही आता घेतलेल्या ग्रामसभेच्या उपस्थितीपेक्षा अधिक असणे आवश्यक राहील. या ग्रामसभेपेक्षा अधिक उपस्थिती असली तरच वरील दोन्ही ठराव रद्द होऊ शकतील. व वरील दोन्ही विषयांचे होकारार्थी ठराव मंजूर किंवा नुतनीकरण करावयाचे असल्यास भविष्यात होणा-या कोणत्याही ग्रामसभेमध्ये उपस्थित कोरमच्या अनुषंगाने त्याचे होकारार्थी नुतीकरण करण्यात यावे. असा ठराव अंकुश प्रभाकर गावडे यांनी मांडला याला श्रीकांत सुर्यकांत गावडे यांनी अनुमोदन दिले.
गावात आला तर गावाची काय परिस्थिती होईक हा विचार करून निश्चितच याचा द्वेष व तिरस्कार वाटेल व भावी पिढी मोठ्या संकटात सापडेल याची जाणीव ग्रामस्थांना झाल्याने हा संघर्षाचा लढा उभा राहिला आहे. वेंगुर्ला पंचायत समिती नेहमी तुमच्या पाठीशी राहील असे सभापती शंकर घारे म्हणाले.
फोटो – विशेष ग्रामसभेला शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!