छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

*कोंकण एक्सप्रेस*
*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान*
*अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्या-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे*

*सिंधुदुर्गनगरी*
शासनाने महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा लाभ शेवटच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यामध्ये २२ जुलै, २५ जुलै व २६ जुलै २०२६ या तीन दिवसांपैकी एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या समाधान शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
मुख्यमंत्री महोदय यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यामध्ये वरील दिवशी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे पुढे म्हणाल्या की, मतदार संघाच्या भौगोलिक रचना/ जनतेची स्थानिक मागणी विचारात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन स्थानिक स्तरावर कार्यक्रम घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देण्याबबात शासनाने निर्णय घेतला असून त्यानुसार प्रमाणपत्र वाटप करावे, गावाठाणातील नागरिकांना स्वामित्व देण्याची सनद वाटप करावी, तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, जिवंत सातबारा मोहिम,राजमाता जिजाऊ महिला सक्षमीरण योजना, घरकुल योजना अशा विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा असेही त्या म्हणाल्या.  तसेच महसूल विभागासह या अभियानात ग्रामविकास, समाज कल्याण, महिला व बालविकास, नगरविकास, कृषी, वन, आरोग्य, परिवहन , भूमी अभिलेख, पशुसंवर्धन व दुग्धविकास तसेच पोलिस विभागांच्या सेवा आणि योजनांचा लाभ देखील नागरिकांना देण्याचे श्रीमती धोडमिसे यांनी आवाहन केले आहे.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, बालाजी शेवाळे, नितिन राऊत,प्रांत अधिकारी जगदीश कातकर, विरसिंग वसावे यांच्यासह सर्व तहसिलदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!