*कोंकण एक्सप्रेस*
*मोती तलावातील दूषित पाणी आणि फुटपाथवरील शेवाळ हटवा*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) : सावंतवाडी शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या मोती तलावातील पाणी सांडपाणी आणि गटारांचे मळमिश्रित पाणी थेट मिसळल्यामुळे गंभीर-रीत्या दूषित झाले आहे. स्वच्छता करण्याची आणि योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.शहरातील इमारती व परिसरातील गटारांचे तसेच सांडपाण्याचे पाणी थेट तलावात सोडले जात आहे.अशुद्ध पाण्यामुळे तलावाच्या पात्रात दुर्गंधी सुटली असून पाण्यावर मळकट तवंग जमा होत आहे. पाण्यातील प्रदूषण वाढल्यामुळे यापूर्वी तलावातील मासे मृत पावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नगरपरिषद प्रशासन या ऐतिहासिक तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तलावात येणारे सांडपाणी तातडीने बंद करावे. तलावाची तातडीने साफसफाई करून पाण्याचा निचरा आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा.
शहराची प्रमुख ओळख आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या मोती तलावातील दूषित पाणी,तलावाभोवतीच्या फुटपाथवर साचलेले शेवाळ आणि शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे या गंभीर समस्यावरून योग्य ती कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा.शहरातील काही भागातील गटाराचे पाणी, रस्त्यावरील घाण आणि तलावाकाठच्या काही इमारतीचे ड्रेनेज थेट ऐतिहासिक मोती तलावात सोडले जात आहे. यामुळे तलावातील पाणी प्रचंड दूषित झाले असून तलावाला दुर्दशा प्राप्त झाली आहे. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात भाविक अत्यंत श्रद्धेने याच तलावात गणपती विसर्जन करतात. परंतु सध्या तलावात साचत असलेल्या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नगरपालिकेने तात्काळ योग्य ती कारवाई करून मोती तलाव स्वच्छ व प्रदूषण मुक्त करावा. अशी मागणी जनतेकडून करण्यात आली आहे

