*कोंकण एक्सप्रेस*
*शिरोडा – सावंतवाडी महामार्गावरील आजगांव वाघबीळ येथील वळण धोकादायक*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) : शिरोडा – सावंतवाडी महामार्गावरील आजगांव वाघबीळ येथील वळण रस्त्याच्या दुतर्फा मोठया प्रमाणात वाढलेल्या झाडीमुळे वाहनचालकांना दिवसेंदिवस अडचणीचा सामना करावा लागत असल्याने या मार्गांवर अपघातांचा धोका वाढत चालला आहे.तसेच संपूर्ण मार्गांवर पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्री – अपरात्रीच्या वेळी परिस्थिती धोकादायक बनत चालली आहे.
सदर महामार्गांवरून गोवा येथे कामानिमित्त तसेच इतर कारणासाठी ये-जा करणारे अनेक तरुण-तरुणी दिवस-रात्र या मार्गाचा वापर करतात. मात्र रस्त्यालगत वाढलेली झाडी आणि अंधारामुळे वाहनचालकांना समोरील रस्ता, वळणे तसेच येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आजगांव – वाघबीळ परिसरातील वाढलेली झाडी त्वरित हटवावी व आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे बसवावेत. सदर महामार्गांवर संरक्षक कठडा बांधण्यात यावा.तसेच प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आली आहे.

