*कोंकण एक्सप्रेस*
*घोटगे येथे ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उत्साहात..*
*दोडामार्ग : शुभम गवस *
तालुक्यातील घोटगे येथे ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन गुरुवार, दि. २१ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ग्रामस्थांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उभारण्यात आलेल्या या नव्या इमारतीमुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून अंगणवाडीतील बालकांना सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या उद्घाटन कार्यक्रमाला पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, माजी पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी, भाजप जिल्हा सरचिटणीस सुधीर दळवी, सरपंच भक्ती दळवी, उपसरपंच विजय दळवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य समीक्षा दळवी, तृप्ती दळवी, मंदिरी जाधव, विद्या गावडे, ग्रामस्थ भरत दळवी आदी उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत अधिकारी विष्णू सावंत, अंगणवाडी सेविका जोस्ना नाईक, आशा सेविका साक्षी दळवी, कर्मचारी दीपक दळवी, साईनाथ सुतार, अर्पणा नाईक, सावित्री दळवी यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमादरम्यान ग्रामविकासासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. नारायण वासुदेव दळवी यांनी ग्रामपंचायत कार्यालयासाठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल, तसेच आबा भिवा दळवी व त्यांच्या कुटुंबीयांनी अंगणवाडीसाठी जागा दिल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गावाच्या विकासासाठी अशा सुविधांची आवश्यकता अधोरेखित करत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या एकोप्याचे कौतुक केले. नव्या इमारतीमुळे ग्रामपंचायत प्रशासन अधिक सक्षम होईल तसेच बालकांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

