*कोंकण एक्सप्रेस*
*वैश्यवाणी समाजाच्या OBC प्रश्नावर : आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश*
*सन २००८ च्या शासन परिपत्रकाप्रमाणे निर्णय घेण्याचे मंत्री अतुल सावे यांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश*
*मंत्री अतुल सावे, मंत्री उदय सामंत आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थिती बैठक संपन्न*
*मुंबई, दि. २५ ऑगस्ट २०२६ :*
वैश्यवाणी समाजाच्या OBC जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी आमदार प्रमोद जठार व आमदार किरण सामंत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
आज माननीय श्री. अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच माननीय श्री. उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वैश्यवाणी समाजाच्या OBC जात प्रमाणपत्र व जात पडताळणीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत मंत्री अतुल सावे यांनी सन २००८ च्या शासन परिपत्रकाप्रमाणे आवश्यक शासन निर्णय घेण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यामुळे वैश्यवाणी समाजाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर सकारात्मक निर्णय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वैश्यवाणी समाजाच्या जुन्या शासकीय अभिलेखांमध्ये ‘वैश्य’, ‘वैश्यवाणी’ आणि ‘वाणी’ अशा वेगवेगळ्या नावांनी नोंदी आढळत असल्याने पात्र नागरिकांना OBC जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, युवकांच्या नोकरीच्या संधी आणि OBC प्रवर्गातील विविध शासकीय सवलती मिळविताना या नोंदीतील फरकामुळे अडथळे निर्माण होत होते.
ही समस्या लक्षात घेऊन आमदार प्रमोद जठार यांनी दि. २० जून २००८ रोजीच्या शासन परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. या मागणीसाठी त्यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
आजच्या सकारात्मक निर्णयामुळे सन २००८ च्या परिपत्रकाप्रमाणे शासन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असून, ‘वैश्य’, ‘वैश्यवाणी’ व ‘वाणी’ अशा नोंदींमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा आहे.
तसेच, वैश्यवाणी समाजाचा OBC यादीतील क्रमांक १९० वरील समावेश अबाधित ठेवून, पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणीची प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करता यावी, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे वैश्यवाणी समाजातील विद्यार्थी, युवक, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार तसेच OBC प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार प्रमोद जठार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वैश्यवाणी समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या OBC जात प्रमाणपत्र व जात पडताळणीच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. याबद्दल समाजाच्या वतीने आमदार प्रमोद जठार, मंत्री अतुल सावे तसेच मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
“वैश्यवाणी समाजाला त्यांच्या हक्काचे OBC लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार,” असा निर्धार आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.

