*कोंकण एक्सप्रेस*
*माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर सतीश सावंत यांनी घेतली बंटी पाटील यांची भेट; व्यक्त केल्या शोकसंवेदना*
*कणकवली ः संजना हळदिवे*
महाराष्ट्रातील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डी. वाय. पाटील) यांच्या निधनानंतर, सिंधूदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी कोल्हापूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे सुपुत्र व माजी मंत्री बंटी पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे संपूर्ण पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून राजकीय व सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. आज कोल्हापूर येथील ‘अजिंक्यतारा’ निवासस्थानी सतीश सावंत यांनी बंटी पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले.
“डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक महान शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासू राजकीय व्यक्तिमत्त्व गमावले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील,” अशी भावना या वेळी सतीश सावंत यांनी व्यक्त केली.
या सांत्वनपर भेटीदरम्यान जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील, हरकुळ बुद्रुकचे सरपंच बंडू ठाकूर यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


