*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; दीड कोटींचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त, राजस्थानचा आरोपी गजाआड*
*सिंधुदुर्गनगरी*
गोवा ते मुंबई महामार्गावरून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीविरोधात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) आज अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ओरोस येथील जिजामाता चौकात पोलिसांनी एका १० टायरी ट्रकमधून तब्बल १ कोटी ५० लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये १ कोटी १५ लाख रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूचा समावेश आहे. याप्रकरणी राजस्थानमधील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ओरोस येथील जिजामाता चौकात सापळा
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, शनिवार दिनांक ०४ जुलै २०२६ रोजी पहाटे ०१:४५ वाजण्याच्या सुमारास गोवा-मुंबई महामार्गावरील ओरोस येथील जिजामाता चौकात पोलिसांनी सापळा रचला होता. संशयास्पद वाटणारा टाटा सिग्मा १० टायरी ट्रक अडवून त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले.
अटक केलेला आरोपी:
विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९ वर्ष, रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर, संगतडा, राजस्थान).
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
गोवा बनावटीची दारू: रु. १,१५,२०,०००/- (एक कोटी पंधरा लाख वीस हजार)
टाटा सिग्मा १० टायरी ट्रक: रु. ३५,००,०००/- (पस्तीस लाख)
मोबाईल फोन: रु. १०,०००/-
एकूण किंमत: रु. १,५०,३०,०००/- (एक कोटी पन्नास लाख तीस हजार)
विविध कलमान्वये गुन्हा दाखल
याप्रकरणी आरोपीविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(a), (e), ८१, ८३ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२), ३३६(२)(३), ३४०(२), आणि ३(५) अन्वेये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदरची धडक कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मा. श्री. मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक मा. कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या यशस्वी मोहिमेत PSI हनुमंत भोसले, ASI सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोजा तसेच पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिस्कर आणि ऋषिकेश टोपले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

