कै.सिताराम सखाराम तर्फे सर स्मृती चारिटेबल ट्रस्टचे आदर्श पुरस्कार जाहीर

कै.सिताराम सखाराम तर्फे सर स्मृती चारिटेबल ट्रस्टचे आदर्श पुरस्कार जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*कै.सिताराम सखाराम तर्फे सर स्मृती चारिटेबल ट्रस्टचे आदर्श पुरस्कार जाहीर*

*माध्यमिक विभागातून श्री प्रमोद सावंत (जांभवडे)तर प्राथमिक विभागातून श्री सत्यवान घाडीगावकर ,(सोनवडे)यांची निवड*

*कुडाळ : प्रतिनिधि*

जांभवडे तालुका कुडाळ येथील कै. सिताराम सखाराम तर्फे सर स्मृती चारिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी माध्यमिक आणि प्राथमिक विभागातून जांभवडे पंचक्रोशी मर्यादित आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातात. न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे चे माजी पर्यवेक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते कै.सिताराम सखाराम तर्फे सर यांच्या स्मृतिपित्यर्थ स्थापन केलेल्या ट्रस्टच्या वतीने दरवर्षी विविध शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक ,वैद्यकीय उपक्रम राबविण्यात येतात . ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका, शवपेटी उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच त्यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात .यावर्षीचा माध्यमिक विभागातून दिला जाणारा पुरस्कार जांभवडे गावचे सुपुत्र ,सरांचे आवडते विद्यार्थी विद्यार्थी श्री .प्रमोद साबाजी सावंत, पूर्णवेळ शिक्षक ,नवाहिंद ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स आर्ट्स अँड व्हाॅकेशनल ,दादर पूर्व ,मुंबई यांना जाहीर करण्यात आला आहे. ते जून 1994 पासून गेली बत्तीस वर्षे त्या ठिकाणी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत आहेत .विद्यार्थी दशेपासून ते अतिशय हुशार ,प्रामाणिक, जिद्दी ,मेहनती विद्यार्थी राहिलेले आहेत .अभ्यास करत असताना सुरुवातीपासूनच लेखन गायन ,वादन भजन ,चित्रकला मूर्तिकला, निवेदन वकृत्व ,अभिनय इत्यादी कला त्यांनी अवगत केल्या आहेत. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. गावातील सामाजिक कार्यामध्ये ते हिरिरीने भाग घेतात. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या व्यवसाय अभ्यासक्रम आणि परीक्षा संरचनेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केलेले आहे. लायन्स क्लब ऑफ ग्रेटर मुंबई यांच्याकडून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार यापूर्वी प्राप्त झालेला आहे .त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून ट्रस्टच्या वतीने त्यांना हा सन्मानपूर्वक आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे .प्राथमिक विभागातून श्री सत्यवान भरत घाडीगांवकर,केंद्रप्रमुख शिरवंडे केंद्र यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे .ते सोनवडे गावचे सुपुत्र असून सोनवडे तर्फ कळसुली दुर्गम भागात प्राथमिक शिक्षण घेऊन हे न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. सुरुवातीपासूनच शालेय जीवनात ते हुशार विद्यार्थी मानले जात असत .डीएड केल्यानंतर त्यांनी 18 /2/ 1989 ला आपल्या शिक्षकी सेवेला पिकुळे तालुका दोडामार्ग येथे सुरुवात केली .त्यानंतर सावंतवाडी ,कुडाळ कणकवली तालुक्यातील
अनेक शाळांमध्ये त्यांनी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केली .त्यानंतर त्यांनी पदवीधर शिक्षक म्हणून आणि मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केल्यानंतर 2025 मध्ये त्यांची केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती झाली. या संपूर्ण काळात त्यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विविध शाळांमध्ये सर्वसामान्य ग्रामीण भागातील दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थी घडवण्याचा विशेष प्रयत्न केला .शैक्षणिक कामगिरी करत असताना विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही ते अग्रेसर राहिलेले आहेत .
सदर पुरस्काराबद्दल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा तर्फे सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे सर्व विश्वस्त यांनी श्री प्रमोद सावंत आणि श्री सत्यवान घाडीगावकर यांचे अभिनंदन केले .सदर पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी जांभवडे बामणवाडी येथे सन्मानपूर्वक करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!