जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पोक्सो कायद्याविषयी जनजागृती

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पोक्सो कायद्याविषयी जनजागृती

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पोक्सो कायद्याविषयी जनजागृती*
*सिंधुदुर्गनगरी*
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, नेरूर माड्याची वाडी येथे बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम, 2012 (पोक्सो कायदा) या विषयावर जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. देर्शिगकर, पॅनल विधीज्ञ अॅड. आशपाक शेख, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अॅड. आशपाक शेख यांनी पोक्सो कायद्याची उद्दिष्टे, बालकांवरील लैंगिक अत्याचार, छेडछाड, लैंगिक शोषण, अश्लील कृत्ये आदी गुन्ह्यांबाबत कायद्यातील तरतुदी तसेच दोषींना होणाऱ्या कठोर शिक्षेविषयी माहिती दिली. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्याची माहिती प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून पालक आणि शिक्षकांनीही सतर्क व जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सचिव ए. जी. देर्शिगकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘सुरक्षित स्पर्श’ आणि ‘असुरक्षित स्पर्श’ यातील फरक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून समजावून सांगितला. कोणतीही अनुचित घटना घडल्यास ती तात्काळ आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचीही माहिती देण्यात आली. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय कोणतेही वाहन चालवू नये. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून अपघात झाल्यास वाहन मालकाविरुद्धही कायदेशीर कारवाई होऊ शकते, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!