दिल्लीत राष्ट्रीय नेमबाजीत फोंडाघाटच्या मनस्या फालेची सुवर्ण कामगिरी

*कोंकण एक्सप्रेस
*दिल्लीत राष्ट्रीय नेमबाजीत फोंडाघाटच्या मनस्या फालेची सुवर्ण कामगिरी
*'प्रहार सन्मान' व 'मुख्यमंत्री शिष्यवृत्ती'ने गौरव
*कणकवली : प्रतिनिधी
सर्वसामान्य कुटुंबातील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेची विद्यार्थिनी मनस्या निलेश फाले हिने दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी (फायरिंग) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या देदिप्यमान कामगिरीबद्दल तिला महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री शिष्यवृत्ती’ आणि ‘प्रहार’च्या वर्धापन दिनानिमित्त ‘प्रहार सन्मान’ प्रदान करण्यात आला आहे.
खडतर प्रवासातून सुवर्ण झेप
फायरिंगमधील अचूक लक्ष्यासाठी निवड झाल्यानंतर मनस्याचा हा प्रवास खडतर होता. एप्रिल महिन्यापासून ५८ व्या महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग (ओरोस) येथे तिची निवड चाचणी सुरू झाली. पी.आय. स्टाफचे कठोर मार्गदर्शन, कोल्हापूर ग्रुपमधील निवड आणि त्यानंतर सलग चार कठीण कॅम्प्स पार करत तिने आपली क्षमता सिद्ध केली. अनेक अडथळ्यांवर मात करत तिने प्रथम राज्यपातळीवर सुवर्णपदक जिंकले. शाळा, गाव आणि राज्यासाठी काहीतरी भरीव करून दाखवण्याच्या निर्धाराने ती दिल्लीला रवाना झाली आणि तेथेही अचूक लक्ष्य साधत देशात सुवर्णपदकाची कमाई केली.
पित्याचे कष्ट आणि भक्कम साथ
मनस्याच्या या यशामागे तिचे वडील श्री. निलेश फाले यांचे मोलाचे योगदान आहे. भाजी विक्रीचा व्यवसाय करून अत्यंत प्रतिकूल व गरिबीच्या परिस्थितीत कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या पित्याच्या कष्टांना मनस्याने उत्तम संस्कारांची आणि जिद्दीची जोड दिली. तसेच ५८ व्या महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्गचा संपूर्ण स्टाफ, मुख्याध्यापक प्रसाद पारकर, एनसीसी ऑफिसर आर्या भोगले, एनसीसी ऑफिसर मारुती लाड, क्रीडा शिक्षक अजिंक्य पोकळे, सर्व शिक्षक-कर्मचारी, शाळेचे संचालक मंडळ आणि फोंडाघाट ग्रामस्थांची तिला खंबीर साथ लाभली.
सन्मान आणि शुभेच्छांचा वर्षाव
मनस्याच्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तिला ‘मुख्यमंत्री शिष्यवृत्ती’ जाहीर करून सन्मानित केले. याशिवाय, दैनिक ‘प्रहार’च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून तिच्या पराक्रमी प्रवासाचा गौरव करत तिला ‘प्रहार सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. तिच्या पुढील शैक्षणिक आणि यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगअल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर
ब्रेकिंगकोकणातील जल, जंगल, जमिनी वाचविण्यासाठी कायदेशीर मार्गांनी लढा द्या
ब्रेकिंग*हळवल गणपती साना येथे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ
ब्रेकिंग