*कोंकण एक्सप्रेस*
*रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या पुढाकारातून कनेडीतील विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’ची मोफत सुविधा*
*कणकवली (कनेडी ) : प्रतिनिधी*
विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ, आधुनिक, प्रभावी आणि तंत्रज्ञानाधारित व्हावे या उदात्त हेतूने रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या वतीने कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी येथील विद्यार्थ्यांसाठी ‘आयडियल स्टडी ॲप’ मोफत उपलब्ध करून देण्याचा अभिनव व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साहित्य, सरावासाठी उपयुक्त साधने आणि योग्य मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने रोटरी क्लबने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित विविध शैक्षणिक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध होणार असून, त्यांच्या स्व-अध्ययनाला आणि शैक्षणिक प्रगतीला निश्चितच मोठी चालना मिळणार आहे.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना ही सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लबच्या सर्व रोटरीयननी मिळून तब्बल १ लाख ३५ हजार रुपयांचा निधी स्वतःच्या खिशातून खर्च केला आहे. या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमासाठी डॉ. अभिजित आपटे यांनी एकट्याने ६५ हजार रुपयांचे उल्लेखनीय योगदान देऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचे सन्माननीय सदस्य नितीन बांदेकर, महेंद्र मुरकर तसेच ‘आयडियल स्टडी ॲप’चे निर्माते श्री. अमोल कामत प्रमुख उपस्थित होते. यावेळी शालेय समितीचे चेअरमन सन्माननीय आर. एच. सावंत, शालेय समिती सदस्य सन्माननीय संतोष सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्माननीय सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्माननीय बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबच्या या स्तुत्य आणि दूरदृष्टीपूर्ण शैक्षणिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलने घेतलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी व अनुकरणीय असून, डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम. हाटले पी. एल्. यांनी केले.

