*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली ग्रामपंचायतीपासून नगरपंचायतीपर्यंतचा प्रवास अविस्मरणीय: मनोज धुमाळे यांच्या सेवेचा गौरव*
*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार; शहराच्या विकासात मोलाचे योगदान असल्याचा गौरव*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली शहराने ग्रामपंचायतीपासून नगरपंचायतीपर्यंतचा घेतलेला विकासाचा प्रवास आणि यादरम्यान मनोज धुमाळे यांनी बजावलेली कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. कणकवली शहराच्या जडणघडणीत आणि विकासात प्रशासकीय अधिकारी म्हणून मनोज धुमाळे यांचा मोठा वाटा राहिला आहे, हे शहर कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यांचे कौतुक केले.
मनोज धुमाळे हे नुकतेच कणकवली नगरपंचायतीच्या सेवाकाळातून सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये श्री. नलावडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आबिद नाईक, माजी नगरसेवक बंडू गांगण, राजू गवाणकर, संदीप राणे, राजा पाटकर, तसेच नवराज झेमने आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी मनोज धुमाळे यांच्या सेवाकाळातील उल्लेखनीय कामांची आठवण करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

