नरेंद्र मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाप्रीत्यर्थ संगमेश्वर तालुका भाजपचे विविध उपक्रम

नरेंद्र मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाप्रीत्यर्थ संगमेश्वर तालुका भाजपचे विविध उपक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*नरेंद्र मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाप्रीत्यर्थ संगमेश्वर तालुका भाजपचे विविध उपक्रम*

*आमदार प्रमोद जठारांचे कार्यकर्त्यांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन*

*​रत्नागिरी:प्रतिनिधी*

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा यशस्वी १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल संगमेश्वर तालुका भाजपच्या वतीने २६ मे ते २५ जून या कालावधीत विविध सामाजिक आणि रचनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी देवरूख येथे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत मार्गदर्शन केले. “या सर्व कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांनी सेवाभावी वृत्तीने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून हे मिशन यशस्वी करावे,” असे आवाहन आमदार जठार यांनी यावेळी केले.
​महिनाभर चालणारे विविध कार्यक्रम:
​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना घराघरांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने संगमेश्वर तालुक्यात महिनाभर खालीलप्रमाणे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत:
​५ जून: संपूर्ण तालुक्यात व्यापक स्तरावर वृक्षलागवड करण्यात येईल.
​६ जून: ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबवली जाईल.
​८ ते १४ जून: तालुक्यातील तब्बल ५०० ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन, त्यांना पुस्तके (भेटवस्तू) देऊन सन्मानित करण्यात येईल.
​१२ जून: देवरूख येथील सद्गुरू लोकमान्य वाचनालय येथे बुद्धिजीवी व्यक्तींचे संमेलन आयोजित केले जाईल. तसेच चित्रकला, निबंध स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
​२१ जून: जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.
​२५ जून: आणीबाणीच्या काळातील सत्याग्रही व ज्येष्ठ व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात येईल.
​आमदार प्रमोद जठार यांचे मार्गदर्शन व सत्कार:
​मंगळवारी देवरूख येथील भाजप कार्यालयाला भेट दिली असता, तालुका भाजपच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मोदी सरकारने गेल्या १२ वर्षांत सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. या योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे.
​प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:
​या बैठकीला भाजपचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, विनोद म्हस्के, तालुका उपाध्यक्ष विजय गुरव, तालुका सरचिटणीस सचिन बांडागळे, माजी उपनगराध्यक्ष निलेश भुरवणे, देवरूख शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये, शंकर मालप, सदानंद राजवाडे, संतोष केदारी, डॉ. अमित ताठरे, धोंडू करंबेळे, नगरसेवक रूपेश भागवत, पंचायत समिती सदस्या दुर्वा पाष्टे, नगरसेविका श्रद्धा इंदुलकर, समृद्धी वेलवणकर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा वैदेही बने, दिगंबर पाष्टे, संजय नटे, दिनेश गुरव, संजय अणेराव यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!