*कोंकण एक्सप्रेस*
*मंजूर घरकुलांचा निधी व जनसुविधा केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी; दोडामार्ग मनसेचे तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन…*
*दोडामार्ग :शुभम गवस*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोडामार्ग तालुका पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले.
मनसेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, दोडामार्ग तालुक्यात अनेक घरकुले मंजूर होऊनही लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचे नमूद केले. त्यामुळे अनेक लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले असून मंजूर घरकुलांचा निधी तातडीने वितरित करावा, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
तसेच तहसीलदार यांना दिलेल्या दुसऱ्या निवेदनात, दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना विविध दाखल्यांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने जनसुविधा केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना दाखले मिळविण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी भूमिका मनसेने मांडली.
यावेळी तालुकाध्यक्ष विनायक कृष्णा सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदने सादर केली. या वेळी गजानन शिरसाट, पांडुरंग जाधव, प्रदीप नाईक, संजीव गवस यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मनसेने दोन्ही प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.

