*कोंकण एक्सप्रेस*
*तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेत आरे गावचे प्रगतिशील शेतकरी प्रभाकर कदम यांचा प्रथम क्रमांक*
*यशाबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव*
*शिरगाव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील आरे गावचे प्रगतिशील शेतकरी श्री. प्रभाकर सखाराम कदम यांनी तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल गुरुवार दिनांक १४ मे २०२६ रोजी कणकवली येथे आयोजित उपविभागस्तरीय खरीप कार्यशाळेमध्ये त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादनवाढ, पीक नियोजन तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रांताधिकारी मा. श्री. जगदीश कातकर, उपविभागीय कृषी अधिकारी मा. श्री. उमाकांत पाटील, तहसीलदार देवगड मा. श्री. रमेश पवार, गटविकास अधिकारी मा. श्री. चव्हाण साहेब, तालुका कृषी अधिकारी कणकवली मा. श्री. ओहोळ साहेब, तालुका कृषी अधिकारी देवगड श्रीमती पाटील मॅडम तसेच तालुका कृषी अधिकारी वैभववाडी श्री. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. प्रभाकर कदम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब, नियोजनबद्ध मेहनत आणि शेतीविषयक अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
श्री. प्रभाकर कदम यांच्या या यशाबद्दल आरे गावासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

