*कोंकण एक्सप्रेस*
*पदवीसोबतच विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराची गुरुकिल्ली !*
कौशल्यसंपन्न विद्यार्थ्यांच्या निर्मितीसाठी : करिअर कट्टा आणि शिरगांवच्या कर्ले महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार*
*शिरगांव : संतोष साळसकर*
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तथा महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत वैभववाडी येथे महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र करिअर कट्टा आणि देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय यांच्यात १३ मे रोजी वैभववाडी येथील आनंदिबाई रावराणे महाविद्यालय येथे कॉलेज ऑफ एक्सलन्स विथ पोटेन्शियल योजनेसाठी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार ग्रामीण व मध्यम स्वरूपाच्या महाविद्यालयांच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. याप्रसंगी करिअर कट्टा अध्यक्ष यशवंत शितोळे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ.अजित दिघे तसेच पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार पार पडला .
कॉलेज ऑफ एक्सलन्स विथ पोटेन्शियल या योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर मार्गदर्शन, उद्योजकता विकास, कौशल्य प्रशिक्षण, भावनिक बुद्धिमत्ता विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच स्टार्टअप संस्कृती विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत रोजगारक्षम बनविणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या योजनेअंतर्गत महाविद्यालयांना स्किल ट्रेनिंग मॉड्युल्स, किक स्टार्ट सेटअप, वर्कशॉप साहित्य, वेलकम बोर्ड, प्रिंटर, राउंड टेबल व खुर्च्या, रेकॉर्डिंग कॉर्नर तसेच सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय स्टार्टअप समिट, सॉफ्ट स्किल मेंटरशिप, ऑनलाइन व ऑफलाइन मार्गदर्शन, ॲड-ऑन कोर्सेस आणि विविध विभागीय प्रशिक्षण उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार आहेत.
विद्यार्थी संख्येनुसार महाविद्यालयांना ९ हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत आर्थिक प्रोत्साहन निधी उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी आवश्यक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन,आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच उपक्रमांचे नियमित दस्तऐवजीकरण आणि अहवाल सादर करणे बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात करिअर समिती स्थापन करून उपक्रमांचे सातत्याने मूल्यमापन व गुणवत्ता तपासणी केली जाणार आहे.
सदर सामंजस्य कराराचा कालावधी पाच वर्षांचा असून भविष्यात संबंधित महाविद्यालयांना सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून विकसित करण्यासाठी हा उपक्रम मजबूत पाया ठरणार आहेत

