सिंधुदुर्गातील जमीन व्यवहारांची चौकशी करा; मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिंधुदुर्गातील जमीन व्यवहारांची चौकशी करा; मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गातील जमीन व्यवहारांची चौकशी करा; मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*

*सिंधुदुर्ग / कणकवली : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांमध्ये गेल्या १० वर्षांत झालेल्या सर्व जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची सखोल व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. मनसेचे संपर्क अध्यक्ष (कणकवली विधानसभा) संतोष शिंगाडे यांनी यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

जिल्ह्यातील जमीन ही स्थानिक शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी निगडित असल्याने जमीन महसूल, कुळवहिवाट व शेतजमीन कायदे तसेच आवश्यक परवानग्यांचे पालन झाले आहे की नाही, याची तपासणी करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांतील मागील १० वर्षांतील सर्व जमीन व्यवहारांची खरेदीदाराची पात्रता, आवश्यक परवानग्या आणि जमीन वापराच्या नियमांनुसार छाननी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच Index-II, ७/१२ उतारे, ८-अ उतारे, फेरफार नोंदी, खरेदीदाराची कायदेशीर पात्रता आणि शेतकरी असल्यास आवश्यक परवानग्या यांची अचूक पडताळणी करण्याची मागणी मनसेने केली आहे.

अनधिकृत प्लॉटिंग, बेकायदेशीर बांधकामे, बनावट कागदपत्रे, गैरव्यवहार तसेच पावर ऑफ ॲटर्नीच्या माध्यमातून झालेल्या संशयास्पद व्यवहारांची विशेष चौकशी पथकाद्वारे (SIT) तपासणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री, कोकण विभागीय आयुक्त तसेच देवगड, वैभववाडी आणि कणकवलीच्या तहसीलदारांकडे माहिती व पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!