गोवा मेडिकल आणि केएलई बेळगावमध्ये ‘महात्मा फुले योजना’ पुन्हा सुरू होणार; आमदार केसरकरांच्या मागणीला यश

गोवा मेडिकल आणि केएलई बेळगावमध्ये ‘महात्मा फुले योजना’ पुन्हा सुरू होणार; आमदार केसरकरांच्या मागणीला यश

*कोंकण एक्सप्रेस*

*गोवा मेडिकल आणि केएलई बेळगावमध्ये ‘महात्मा फुले योजना’ पुन्हा सुरू होणार; आमदार केसरकरांच्या मागणीला यश*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

श्री.दिपकभाई केसरकर यांच्या मागणीनुसार.ना.श्री. प्रकाश आबिटकर ,मंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य भवन मुंबई येथील आरोग्य मंत्री यांच्या दालनामध्ये मतदार संघातील सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील विविध आरोग्य विषयक प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सावंतवाडी येथे उभारण्यास येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विषयक समस्या व इतर संबधित आरोग्याच्या विषयांसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.बैठक . सदर बैठकीस श्री. दीपकभाई केसरकर, आमदार सावंतवाडी विधानसभा, श्री.प्रितेश राऊळ, आरोग्य व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग,राज घराण्याच्या वतीने युवराज श्री.लखमराजे भोसले तसेच राजघराण्याचे जावई. श्री कुमार भोगले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी अभियान आयुक्त सुनील भोकरे तसेच आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, कोल्हापूर परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, श्री. रविंद्र खेबुडकर, मुख्य कार्य अधिकारी जि.प सिंधुदूर्ग, श्री. श्रीपाद पाटील,जिल्हा शल्य चिकीत्सक, सौ.सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकी मध्ये खालील विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

1. सावंतवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.सदर जागेच्या विषयासंदर्भात न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असल्याने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यास विलंब होत आहे. त्याबाबत राजघराण्याच्या वतीने युवराज श्री. लखम राजे भोसले तसेच राजघराण्याचे जावई श्री.कुमार भोगले यांच्याशी संविस्तर चर्चा करण्यात आली. दोघांनीही सदर हॉस्पीटलचे बांधकाम लवकरात लवकर करणे अत्यंत आवश्यक असून सदर बांधकाम सुरु करण्यासाठी आमची कोणतीही हरकत नसल्याचे मान्य केले. तसे नाहरकत प्रतिज्ञापत्र लवकरात लवकर माननीय न्यायालयामध्ये सादर करण्याचे राज घराण्याच्या दोन्ही प्रतिनिधींनी मान्य केले. तसेच सदर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर होऊन सुमारे सात वर्ष एवढा कालावधी झाल्याने सदर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे नव्याने अंदाजपत्रक सादर करणेबाबत मंत्री महोदयांनी संबंधीतांना आदेश दिले. तसेच प्रस्तावीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाजुला असलेली उपजिल्हा रुग्णालयाची इमारत दोन मजली करणेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मा. मंत्री महोदयांनी दिले.त्यामुळे सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणार आहे.

2. तसेच सिंधुदूर्ग जिल्हयातील रुग्णालयांमध्ये मंजूर परंतू बऱ्याच कालावधीपासून डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने सिंधुदूर्ग जिल्हयातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे रिक्त असलेली डॉक्टर व अन्य कर्मचारी यांची पदे भरणेबाबत सविस्तर आढावा घेऊन ती पदे लवकरात लवकर भरण्याबाबत चर्चा करण्यात आली. मा. मंत्री महोदयांनी याची तात्काळ दखल घेऊन येत्या महिन्या भरात सदरचा प्रश्न निकाली काढ णेबाबत आदेश दिलेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे महिन्याभरात भरण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.

3. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेज गोवा आणि के एल ई हॉस्पिटल बेळगाव येथे आरोग्य सुविधा मिळत होती. परंतु सद्यस्थितीत गोवा मेडीकल कॉलेज, गोवा आणि के.एल.ई. हॉस्पीटल, बेळगांव, कर्नाटक हॉस्पीटल मध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत देण्यात येणारी आरोग्य सुविधा सिंधुदुर्ग जिल्हयातील रुग्णांसाठी बंद करण्यात आलेली आहे. यापुर्वी सदरची योजना केंद्र सरकारच्या पोर्टल अंतर्गत कोड नं. HBP2025MH.xlsx ने सुरु होती. मात्र सद्यस्थितीत सदर पोर्टल वरील कोड व सुविधा बंद केल्याने महाराष्ट्रातील विशेषत: सिंधुदुर्ग जिल्हयातील रुग्णांना महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे सिंधुदूर्ग जिल्हयातील रुग्णांची परवड होत असल्याबाबत आमदार दीपक केसरकर यांनी आरोग्य मंत्री महोदयांच्या निदर्शनात आणून दिले. मा. मंत्री प्रकाश आबिटकर यांनी याची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर सदर योजना पुन्हा सुरु करणेबाबत आश्वाशीत केले.

4. सिंधुदूर्ग जिल्हयातील मंजूर असलेले व मंजूरी साठी प्रस्तावीत असलेली आरोग्य केंद्र व उपकेंद्र इमारत बांधकामाच्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजूरी देऊन निधी उपलब्ध करुन देणेबाबत. चर्चा करण्यात आली त्यानुसार मा. मंत्री यांनी सदर कामे लवकरात लवकर मंजूरी देणेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना दिलेत.

5. राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लौकिक आहे.उत्तम निसर्ग सौंदर्य लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला भारतातील पहिला “स्वच्छ जिल्हा” म्हणून पारितोषिक प्राप्त आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात.या पर्यटकांना आयुर्वेद,पंचकर्म,योग,नेचरोपॅथी यांचे फार मोठे आकर्षण आहे.भारत सरकारच्या आयुष मंत्रालयामार्फत वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी हे महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर वसलेले आहे.येथे परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच मालवण तालुक्यातील आचरा हे समुद्रकिनारी वसलेले आहे.आंबोली हे वर्षा पर्यटनासाठी सुप्रसिद्ध आहे.येथे येणारे देश विदेशातील पर्यटकांचे प्रमाण फार मोठे आहे.आयुष मंत्रालयामार्फत सादर करण्यात आलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात वैद्यकीय पर्यटनामध्ये आयुष सेवांचा अंतर्भाव करण्यास प्राधान्य दिलेले आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे स्वास्थ्य केंद्र तसेच इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष वेलनेस क्लिनिक सुरू करण्याची मागणी करण्यात आली .जिल्हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे सिंधुदूर्ग जिल्हयामध्ये पंचकर्म सुविधा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागकडे सादर करण्यात आलेला आहे. सिंधुदूर्ग जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी, आंबोली व मालवण तालुक्यातील आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी पंचकर्म सुविधा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यास लवकरात लवकर मंजूरी देण्यात यावी अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती श्री.प्रितेश राऊळ यांनी केली .त्यानुसार मा. मंत्री महोदयांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यामधील आरोग्य विभागाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर परिचारिकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यास मोठया प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. यावर सविस्तर चर्चा बैठकी मध्ये करण्यात आली. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत मंत्री महोदयांनी संबधीतांना आदेश दिलेत.

वरील प्रमाणे सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे तसेच सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विषयक समस्या व सिंधुदूर्ग जिल्हयातील एकूण आरोग्य विषयक समस्या बाबत सदर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली व सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लाऊन जिल्हयातील आरोग्य सुविधांबाबतीत भेडसावणाऱ्या सर्व समस्याबाबत तोडगा काढ ण्याचे मंत्री महोदयांनी आश्वासित केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!