दोडामार्गच्या विकासाला आता मिळणार नवी गती ; आरोग्य सेवांबाबत आमदार प्रमोद जठार यांचे मोठे आश्वासन

दोडामार्गच्या विकासाला आता मिळणार नवी गती ; आरोग्य सेवांबाबत आमदार प्रमोद जठार यांचे मोठे आश्वासन

*कोंकण एक्सप्रेस*

*“दोडामार्गच्या विकासाला आता मिळणार नवी गती ; आरोग्य सेवांबाबत आमदार प्रमोद जठार यांचे मोठे आश्वासन”*

*दोडामार्ग :शुभम गवस*

दोडामार्ग तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत भाजपची सत्ता असल्याने आगामी काळात विकासकामांना मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास विधानपरिषद सदस्य आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत असून, पुढील पाच वर्षांत तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असे त्यांनी सांगितले.

आमदार प्रमोद जठार यांच्या दोडामार्ग आगमनानिमित्त पिंपळेश्वर चौकात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचे स्वागत झाले. त्यानंतर दोडामार्ग येथील भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस आणि नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते आमदार जठार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर, जि.प. सदस्य रावराणे, सरचिटणीस तथा पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अंकुश नाईक, नगरसेविका संध्या प्रसादी, सभापती पार्वती गवस, पंचायत समिती सदस्य सोनिया नाईक, रंगनाथ गवस यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, पत्रकारांनी दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना उपचारांसाठी वारंवार गोवा राज्यात जावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना आमदार प्रमोद जठार यांनी तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. “येत्या पाच वर्षांत दोडामार्ग तालुक्यातील आरोग्य समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल, असा मला विश्वास आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दोडामार्गच्या विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला असून, भाजपकडून विकासकामे आणि आरोग्य सुविधांबाबत देण्यात आलेली आश्वासने प्रत्यक्षात कितपत उतरतात, याकडे आता तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!