*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गात अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण*
*सिंधुदुर्गनगरी, दि. ०१ (जिमाका) :*
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेले हे अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीन अस्थिव्यंगोपचार विभागासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या मशीनच्या सहाय्याने हाडे व सांधे यांच्याशी संबंधित विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि जलद पद्धतीने करता येणार आहेत. विशेषतः अपघातग्रस्त रुग्ण, फ्रॅक्चर, सांध्यांच्या शस्त्रक्रिया तसेच ऑर्थोपेडिक प्रक्रियांमध्ये यामुळे मोठी मदत होणार आहे.
‘सी-आर्म’ मशीनमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना आधुनिक उपचारांची सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असून, यामुळे वेळ, खर्च आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे.

