*कोकण Express*
*मल्हार पूलावर तात्पुरत्या लोखंडी साकवासाठी 52 लाख रुपयांची निविदा निर्गमित*
*ऑगस्ट अखेरपर्यंत तात्पुरती वाहतूक होणार सुरू*
*पालकमंत्री उदय सामंत यांनी शब्द पाळला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पालकमंत्री उदय सामंत यांनी मल्हार पूलावरून तात्पुरत्या वाहतुकीसाठी लोखंडी साकव बांधणीसाठी 52 लाख रुपये जिल्हा नियोजनमधून मंजूर केले आहेत. या कामाची निविदाही निघाली असून 12 ऑगस्ट नंतर वर्क ऑर्डर निघेल आणि ऑगस्ट महिनाअखेर पर्यंत साकव बांधून पूर्ण होऊन लहान चारचाकी, रिक्षा, टू व्हीलर तसेच माणसांची ये-जा करण्यासाठी हा लोखंडी साकव खुला होईल अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत नाटळ पंचक्रोशीला जोडणारा मल्हार पूल कोसळला होता. साहजिकच त्यामुळे नाटळ पंचक्रोशीचा कनेडी बाजारपेठेशी संपर्क तुटला होता. तुटलेल्या मल्हार पुलाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा नियोजन मधून तात्पुरत्या वाहतुकीसाठी लोखंडी साकव बांधून देण्याचा शब्द दिला होता. तशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.
खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनीही नाटळ पंचक्रोशीवासीयांच्या मागणीनुसार तात्पुरता लोखंडी साकव बांधून जनतेची गैरसोय दूर करण्याचा शब्द दिला होता. येथील कायमस्वरूपी पुलबांधणी संदर्भातही पालकमंत्री सामंत यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश पिडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना दिले होते.पालकमंत्री उदय सामंत यांनी अवघ्या 15 दिवसांत आपला शब्द पाळला असून मल्हार पुलाच्या ठिकाणी तात्पुरत्या लोखंडी साकवासाठी तब्बल 52 लाख रु. मंजूर केले. या कामाची निविदाही आज निघाली असून येत्या 8 दिवसांत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होऊन वर्क ऑर्डर निघेल आणि प्रत्यक्ष लोखंडी साकव बांधणीला सुरुवात होईल. ऑगस्ट महिना अखेरपर्यंत हा लोखंडी साकव बांधून पूर्ण होऊन नाटळ पंचक्रोशीतील जनतेची तात्पुरत्या वाहतुकीची सोय पूर्ण होईल अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.
कायमस्वरूपी काँक्रीट पूल मे 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी शीघ्रगतीने लोखंडी साकव पूल निर्मितीला चालना देत जनतेची गैरसोय दूर केल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, नाटळ पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आभार मानले आहेत.
