*कोंकण एक्सप्रेस*
*जलसंवर्धनाचा जागर; न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटमध्ये जलसंधारण दिन उत्साहात*
*फोंडाघाट : संजना हळदिवे*
जल हेच जीवन असून भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश देत फोंडाघाट एज्यु. सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेमध्ये दि. १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
या सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी जलसंवर्धन प्रतिज्ञा, जलसंधारण जनजागृती प्रभात फेरी तसेच जलसंवर्धनाविषयी जनजागृती करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जलसंधारण क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्र.कृ. पारकर होते. तसेच या कार्यक्रम प्रसंगी जुनिअर कॉलेज प्राध्यापक श्री. फड सर यांनी ‘जलसंवर्धन ही काळाची गरज’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाढती लोकसंख्या, बदलते हवामान आणि पाण्याची दिवसेंदिवस वाढणारी गरज लक्षात घेता जलसंधारण व जलसंवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री. जोईल सर यांनी केले, तर उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या आभार श्री. राठोड सर यांनी म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

