*कोंकण एक्स्प्रेस*
*शाश्वत मूल्ये व रोजगारा भिमुख शिक्षण हे आजच्या विद्यार्थ्यांची शक्तिस्थळे आहेत श्री: अजयराज वराडकर*
*मालवण (कट्टा) : प्रतिनिधी*
“शाश्वत मूल्ये व रोजगाराभिमुख शिक्षण” हे आजच्या विद्यार्थ्यांची शक्ति स्थळे असून रोजगाराभिमुख शिक्षणातून विद्यार्थ्यांसाठी विकासाची द्वारे खुली होत आहेत.तसेच कट्टा दशक्रोशीतील ग्रामीण भाग सुद्धा समृद्ध होतील अशी स्वप्ने आपण सत्यात उतरण्यासाठीच बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाच्या माध्यमातून यशस्वी प्रयोग केलेले असून त्याचे फलित आज होताना दिसत आहे असे उद्गार बहुविध कौशल प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या निमित्ताने वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय ( सं)या ठिकाणी कट्टा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजय राज वराडकर यांनी काढले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे सचिव श्री.सुनील नाईक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सामाजिक बांधिलकीतून संस्थेनी चालवलेल्या या अभ्यासक्रमाचे महत्व सांगितले. यावेळी कर्नल श्री शिवानंद वराडकर यांच्या संकल्पनेचा “गावी रहा व मोठे व्हा”याचा पुनर्विचार करताना व्यावसायिक कौशल्यातून आर्थिक उन्नती साधून आपला व पर्यायाने समाजाचा कसा विकास करता येईल याचे उद्बोधन केले. तसेच विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रवेश घ्यावा याविषयीही आवाहन केले. यावेळी प्रशालेच्या
मुख्याध्यापिका सौ. राऊळ मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी दोन वर्षांच्या कालावधीत केलेल्या मेहनतीचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेली कौशल्ये त्यांच्या पुढील शिक्षणाबरोबरच भविष्यातील करिअरसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.
मल्टी स्किलच्या निदेशक कु. योगिता सोहनी मॅडम यांनी बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती देत अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रत्यक्ष अनुभवांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी कौशल्य शिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली तसेच त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कौशल्याधारित शिक्षणाचे वाढते महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा जीवनात योग्य प्रकारे उपयोग करावा, असे मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांमधून कु. गौरांग वाईरकर, कु. कृतिका लोहार आणि कु. सोहम गुरव, कु. ओंकार रोहीलकर या विद्यार्थ्यांनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये चारही विभागांमध्ये शिकलेल्या कौशल्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन सादर केले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थांचे आकर्षक प्रदर्शन मांडले होते. उपस्थित पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, संस्थेचे सदस्य, शिक्षकवृंद तसेच मल्टी स्किलचे सर्व निदेशक यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक करत विविध खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, कौशल्याचे आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाबरोबरच “कॉज टू कनेक्ट फाउंडेशन” चे आभार मानत मल्टी स्किलच्या सर्व निदेशकांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्कूल कमिटी अध्यक्ष श्री सुधीर वराडकर, खजिनदार श्री श्याम पावसकर, संचालक श्री महेश वाईरकर, बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचे कॉर्डिनेटर भूषण गावडे सर , पर्यवेक्षक श्री. महेश भाट सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक हितचिंतक शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किसन हडलगेकर यांनी केले.

