*कोंकण एक्सप्रेस*
*नोएडा ते कणकवली ‘अलर्ट’ अन् पोलिसांची अॅक्शन! महाराष्ट्र बँकेचे ATM फोडण्याचा चोरट्याचा डाव फसला*
*कणकवली ः संजना हळदिवे*
बँकेची अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि कणकवली पोलिसांची तत्परता यामुळे शहरात सोमवारी पहाटे एक मोठी चोरीची घटना टळली आहे. कणकवली शहरातील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या एटीएमवर (ATM) अज्ञात चोरट्याने दरोडा टाकून पैसे लंपास करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्याला रिकाम्या हाताने पळून जावे लागले. ही घटना सोमवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
नोएडा कंट्रोल रूमच्या ‘त्या’ एका इशाऱ्याने फिरली चक्रे!
कणकवलीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या या एटीएमची सुरक्षा यंत्रणा थेट नोएडा (उत्तर प्रदेश) येथील मुख्य नियंत्रण केंद्राशी (Central Control Room) जोडलेली आहे. सोमवारी पहाटे ३ वाजता अज्ञात चोरट्याने एटीएममध्ये घुसून मशीन फोडण्यास सुरुवात केली. मशीनमध्ये संशयास्पद हालचाल आणि तोडफोड सुरू होताच नोएडा येथील नियंत्रण कक्षात तत्काळ ‘इमर्जन्सी अलार्म’ वाजला. तेथील सुरक्षा रक्षकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता थेट कणकवली पोलिसांशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली.
पोलिसांची गस्त आणि चोरट्याची पळापळ
नोएडावरून माहिती मिळताच रात्रीच्या गस्तीवर (Night Duty) असलेल्या कणकवली पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांची गाडी सायरन वाजवत येत असल्याचे पाहताच चोरट्याने तिथून पळ काढला. पोलिसांची तत्परता आणि बँकेची हायटेक यंत्रणा यामुळे एटीएममधील लाखो रुपयांची रोकड सुरक्षित राहिली असून चोरीचा मोठा डाव फसला आहे.
संशयिताचा फोटो समोर; पोलिसांकडून शोध सुरू
या घटनेमुळे कणकवली शहरात काही काळ खळबळ उडाली आहे. सकाळी पोलिसांनी घटनास्थळाची सविस्तर पाहणी केली. पोलिसांनी एटीएम आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेतले असून, त्यामध्ये संशयित चोरट्याचा फोटो स्पष्टपणे समोर आला आहे. या फुटेजच्या आधारे कणकवली पोलीस फरार अज्ञात चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.

