*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार; ‘बल्क ग्राहक’ डिझेल दराबाबतही महत्त्वाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा!*
*सिंधुदुर्गनगरी (ओरोस):*
सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे सादरीकरण, तसेच मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना लागू असलेल्या ‘बल्क ग्राहक’ डिझेल दरामध्ये आवश्यक बदल करण्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला कुडाळ-मालवणचे आमदार माननीय श्री. निलेशजी राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा
या उच्चस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील शिवरायांच्या प्रस्तावित पुतळ्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला, तसेच मच्छिमारांना भेडसावणाऱ्या डिझेल दराच्या समस्येवरही सखोल चर्चा झाली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही विषयांबाबत आवश्यक उपाययोजनांची माहिती मंत्र्यांसमोर सादर केली. यावर सकारात्मक भूमिका घेत, पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश मंत्री नितेशजी राणे यांनी दिले.
बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये:
श्री. प्रदीप पी. (मत्स्यव्यवसाय आयुक्त)
श्री. प्रकाश खपळे (व्यवस्थापकीय संचालक, मत्स्य उद्योग विकास महामंडळ)
श्री. महेश देवरे (सहआयुक्त)
सौ. तृप्ती धोडमिसे (जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग – व्हीसीद्वारे उपस्थित)
यांच्यासह संबंधित विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे जिल्ह्यातील शिवस्मारकाचा प्रश्न आणि मच्छिमारांच्या डिझेल दराचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

