सावंतवाडी एसटी प्रश्नांवर केसरकरांची परिवहन मंत्र्यांकडे आग्रही मागणी

सावंतवाडी एसटी प्रश्नांवर केसरकरांची परिवहन मंत्र्यांकडे आग्रही मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी एसटी प्रश्नांवर केसरकरांची परिवहन मंत्र्यांकडे आग्रही मागणी*

*सावंतवाडी : संजना हळदिवे*

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील एसटीच्या विविध प्रश्नांबाबत आमदार दीपक केसरकर यांनी आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी सावंतवाडी एसटी बस स्टॅन्डचे बांधकाम तातडीने सुरू करणे, उर्वरित १५ नवीन एसटी बसेस गणेशोत्सवापूर्वी उपलब्ध करून देणे तसेच सावंतवाडी–बेळगाव मार्गे बेंगळुरू आंतरराज्य दैनंदिन बससेवा सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

सावंतवाडी एसटी बस डेपोचे बांधकाम बीओटी तत्त्वावर मंजूर असून प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केसरकर यांनी केली.

दरम्यान, या आठवड्यात सावंतवाडीला पाच नवीन एसटी बसेस प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी परिवहन मंत्र्यांचे आभार मानले. मात्र, शिल्लक १५ बसेस गणेशोत्सवापूर्वी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

सावंतवाडी, सिंधुदुर्ग तसेच कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर आणि बेंगळुरू परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी सावंतवाडी–बेळगाव मार्गे बेंगळुरू बससेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. या सेवेमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच पर्यटकांना मोठा फायदा होणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

या तिन्ही मागण्यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!