खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? काजुळवाडी मुख्य रस्त्याची बिकट अवस्था; नागरिकांत संताप

खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? काजुळवाडी मुख्य रस्त्याची बिकट अवस्था; नागरिकांत संताप

*कोंकण एक्सप्रेस*

*खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? काजुळवाडी मुख्य रस्त्याची बिकट अवस्था; नागरिकांत संताप*

*दोडामार्ग, ✒️शुभम गवस*

तालुक्यातील काजुळवाडी मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून संबंधित विभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
काजुळवाडी हा परिसर पिकुळे, उसप, मांगेली तसेच इतर अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहतूक करणारी वाहने ये-जा करतात. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
स्थानिक नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच शेतकरी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. कामानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना या रस्त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना वाहन घसरून पडण्याची भीती कायम सतावत असते.
सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी गंभीर झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता नेमका कुठे आहे आणि खड्डा कुठे आहे, हेच ओळखणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!