*कोंकण एक्सप्रेस*
*आडाळी एमआयडीसीत अवैध उत्खननाचा आरोप; शिवसेनेचा कारवाईसाठी दबाव..*
*दोडामार्ग : शुभम गवस*
तालुक्यातील आडाळी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध खनिज उत्खननाविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी तसेच एमआयडीसी कार्यालय, कुडाळ यांना निवेदन सादर करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ व दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. आडाळी एमआयडीसी परिसरात सपाटीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खनिजयुक्त माती व इतर खनिजांचे उत्खनन करून त्यांची बाहेर विक्री केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दोडामार्ग तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने अनेक वर्षांपूर्वी आडाळी येथे एमआयडीसीची स्थापना केली होती. मात्र अपेक्षित उद्योगधंदे उभे राहण्याऐवजी परिसरातील नैसर्गिक संपत्तीची लूट होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तसेच उत्खननासाठी आवश्यक परवानग्या व अधिकृत माहिती उपलब्ध नसतानाही मोठ्या प्रमाणावर खनिज चोरी सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून पंचनामा करण्यात यावा, एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून अवैध उत्खननावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार महेश सावंत व माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच आडाळी एमआयडीसी परिसराची पाहणी करणार आहेत. अवैध उत्खननास संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजेश शेटकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, लक्ष्मण आयनोडकर, उपतालुकाध्यक्ष संदेश सावंत, विजय जाधव, प्रेमानंद नाईक, विनोद काजरेकर, प्रमोद सावंत, गोविंद केरकर, सुनील गावडे, गुरूनाथ नाईक, प्रशांत बुगडे, मंदार नाईक, संदेश राणे, विनोद ठाकूर, सोमनाथ गवस, भिवा गवस, संजीव पेडणेकर, गोकुळदास मोठे, विष्णू नाईक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

