नरडवे नाका स्टॉल हटाव प्रकरणाला नवे वळण

नरडवे नाका स्टॉल हटाव प्रकरणाला नवे वळण

*कोंकण एक्स्प्रेस*

*नरडवे नाका स्टॉल हटाव प्रकरणाला नवे वळण*

*तायशेट्ये बंधूंचे निवेदन समोर*

*कारवाईबाबत कोणताही आक्षेप नसल्याची भूमिका*

*कणकवली : प्रतिनिधी*

शहरातील नरडवे नाका येथील स्टॉल हटविण्याच्या कारवाईवरून सध्या कणकवलीत मोठी चर्चा सुरू असताना या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे निवेदन समोर आले आहे. सुहास वसंत तायशेट्ये व त्यांच्या दोन भावांनी कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून संबंधित कारवाईला कोणताही आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले आहे. आज काही नागरिक या हटाव मोहिमेबाबत माहिती घेण्यासाठी कणकवली नगरपंचायत कार्यालयात गेले होते. यावेळी झालेल्या चर्चेत ही कारवाई नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या पुढाकारातून राबविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र या कारवाईची मागणी नेमकी कोणी केली होती, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

दरम्यान, आता समोर आलेल्या निवेदनानुसार सुहास वसंत तायशेट्ये, शरद वसंत तायशेट्ये आणि डॉ. विद्याधर वसंत तायशेट्ये यांनी नगरपंचायतीला लेखी पत्र दिले होते. या पत्रात नरडवे नाका परिसरातील कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील स्टॉल, डॉ. म्हसकर यांच्या हॉस्पिटल समोरील स्टॉल, बेकरी, गॅरेज तसेच इतर काही स्टॉल त्यांच्या मालकीच्या जमिनीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘परवानगी दिलेली नाही’

सदर निवेदनात संबंधित स्टॉलधारकांना मालक म्हणून कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच नगरपंचायतीकडून करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत आमचा कोणताही आक्षेप नसून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रकरणाची चर्चा कायम

नरडवे नाका येथील स्टॉल हटविण्याच्या कारवाईमुळे स्थानिक पातळीवर विविध प्रतिक्रिया उमटत असताना तायशेट्ये बंधूंचे हे निवेदन समोर आल्याने या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा पैलू स्पष्ट झाला आहे. त्यामुळे या कारवाई संदर्भातील चर्चा आणि राजकीय आरोप – प्रत्यारोपांना नवा आयाम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!