सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे*

*माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी*

*कणकवली :प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या तात्पुरत्या /रोजंदारीवर लिपिक पदावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेऊन त्यांच्या भविष्याबाबत न्याय द्यावा, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नेते ,माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे की, ते अनेक वर्षांपासून बँकेच्या विविध शाखांमध्ये तसेच प्रधान कार्यालयात जबाबदारीने कार्यरत आहेत. काही कर्मचाऱ्यांना १० ते १२ वर्षांहून अधिक कालावधीचा अनुभव असून त्यांनी बँकेच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ठेवी, कर्जप्रकरणे, डिजिटल बँकिंग तसेच इतर प्रशासकीय जबाबदाऱ्या त्यांनी निष्ठेने पार पाडल्या आहेत. कोविडसारख्या कठीण काळातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अखंड सेवा दिली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
असे असताना सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमुळे या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अनेक वर्षे सेवा करूनही पुन्हा नव्याने स्पर्धा परीक्षा देण्याची वेळ येत असल्याने त्यांच्यावर मानसिक ताण निर्माण झाला आहे. काही कर्मचाऱ्यांचे वय वाढले असून नवीन भरती प्रक्रियेत स्पर्धा करणे त्यांच्यासाठी कठीण ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी विशेष धोरण राबवावे, त्यांच्या अनुभवाला न्याय देऊन योग्य निर्णय घ्यावा, तसेच आवश्यक असल्यास कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ बँकेच्या सेवेत घालवलेल्या या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या भविष्याबाबत निश्चितता निर्माण व्हावी, यासाठी संबंधितांनी शासन व बँक प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तात्पुरत्या /रोजंदारीवर लिपिक पदावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!