*कोंकण एक्सप्रेस*
*अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे दोडामार्ग येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार*
*दोडामार्ग : शुभम गवस*
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने रविवार, २४ मे रोजी दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेला भव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
दोडामार्ग तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील एकूण ६५ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागील अथक मेहनत, चिकाटी तसेच पालक व शिक्षकांचे मोलाचे योगदान याचाही कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. निरंजन शर्मा उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रभावना यांचे महत्त्व अधोरेखित केले. “यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी दोडामार्ग शहर मंत्री मयूर तर्पे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.

