धार्मिक उत्सवांना सामाजिक कार्याची जोड दिल्याने समाजाचा विकास होतो : सभापती हर्षदा वाळके

धार्मिक उत्सवांना सामाजिक कार्याची जोड दिल्याने समाजाचा विकास होतो : सभापती हर्षदा वाळके

*कोंकण एक्सप्रेस*

*धार्मिक उत्सवांना सामाजिक कार्याची जोड दिल्याने समाजाचा विकास होतो : सभापती हर्षदा वाळके*

*बेळणे खुर्द येथे सत्यनारायण महापूजा व विविध उपक्रम उत्साहात संपन्न*

*कणकवली: प्रतिनिधि*

“केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता, जेव्हा एखादा उत्सव रक्तदान शिबिर, क्रीडा स्पर्धा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो, तेव्हा त्यातून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधीलकी जपली जाते. बेळणे खुर्द येथील मंडळाने धार्मिकतेसोबतच सामाजिक उपक्रमांची जी सांगड घातली आहे, ती खरोखरच कौतुकास्पद असून यामुळेच गावाचे सांस्कृतिक वैभव अधिक समृद्ध होते,” असे गौरवपूर्ण उद्गार कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी काढले.

बेळणे खुर्द येथील श्री महापुरुष मंदिर परिसरात ‘श्री पावणादेवी लिंगेश्वर महापुरुष सेवा मंडळ’ (वरचीवाडी) यांच्या वतीने १० आणि ११ मे रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी बेळणे उपसरपंच पंढरीनाथ चाळके, मुंबई मंडळ अध्यक्ष चंद्रकांत चाळके, ग्रामपंचायत सदस्य अंकिता चाळके, रामेश्वर सोसायटीचे व्हॉईस चेअरमन यशवंत चाळके, तिवरे सरपंच भाई अंबिलकर, बेळणे तंटा मुक्ती अध्यक्ष सुनील तांबे, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान शाखा कणकवलीचे सचिव सुशील परब, सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठानचे सल्लागार अशोक नारकर आदी उपस्थित होते.

उत्सवाच्या मुख्य दिवशी ११ मे रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांनी मोठा सहभाग नोंदवला. या शिबिरात एकूण २९ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.

या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत स्थानिक संघांनी आपला कस लावला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत: विजेता संघ: गेम चेंजर्स, बेळणे.
उपविजेता संघ: चॅम्प स्पोर्ट्स, बेळणे.

महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘फनी गेम्स’मध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकूण ३६ महिलांनी या खेळांमध्ये भाग घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमाची सुरुवात १० मे रोजी महिला व मुलांच्या विविध खेळांनी झाली. ११ मे रोजी दुपारी श्री सत्यनारायण महापूजा, आरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री स्थानिक भजने आणि बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या सोहळ्याची सांगता मुंबई येथील ‘श्री सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ’ (डोंबिवली) यांच्या दर्जेदार नाट्यप्रयोगाने झाली.
या यशस्वी आयोजनाबद्दल श्री पावणादेवी लिंगेश्वर महापुरुष सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला बेळणे आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!