*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग-वीजघर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा; अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तालुका प्रमुख -संजय गवस*
*दोडामार्ग : शुभम गवस*
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या दोडामार्ग-वीजघर रस्त्याच्या कामाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख संजय गवस यांनी तीव्र भूमिका मांडली आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आलेली आहे, त्या सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत, अन्यथा संबंधितांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सध्या या रस्त्याचे काम काही ठिकाणी समाधानकारक आणि जलद गतीने सुरू असले, तरी कोकणात मे अखेरीस पावसाला सुरुवात होते. त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परिणामी अपघातांची शक्यता वाढून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, अशी चिंता गवस यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी या कामावर जातीनिशी लक्ष ठेवून मे अखेरीपर्यंत खोदाई झालेल्या सर्व रस्त्यांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी ठेकेदारांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा तालुक्यातील जनतेचा संताप उफाळून येईल आणि त्याला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

