बापर्डे येथील प्रज्वल गायकवाड यांना ‘राष्ट्रीय जीवनगौरव’ पुरस्काराने गौरव

बापर्डे येथील प्रज्वल गायकवाड यांना ‘राष्ट्रीय जीवनगौरव’ पुरस्काराने गौरव

*कोंकण एक्सप्रेस*

*बापर्डे येथील प्रज्वल गायकवाड यांना ‘राष्ट्रीय जीवनगौरव’ पुरस्काराने गौरव*

*पत्रकारिता, समाजसेवा व छायाचित्रणातील कार्याची दखल*

*शिरगांव : संतोष साळसकर**

जिद्द, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा असेल, तर कोणतीही अडचण यशाच्या आड येत नाही, याचा प्रत्यय देवगड तालुक्यातील बापर्डे येथील प्रज्वल विनोद गायकवाड इनामदार यांनी आपल्या कार्यातून दिला आहे. पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र आणि फोटोग्राफीमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार – २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.

ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. १०० टक्के कर्णबधिर असतानाही प्रज्वल यांनी पत्रकारिता आणि समाजकार्यात सातत्याने सक्रिय राहून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

प्रज्वल यांनी २०१७ मध्ये दहावी व २०१९ मध्ये बारावी उत्तीर्ण केली. त्यानंतर पदवी शिक्षण घेत असताना विविध तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली. २०१७ मध्ये त्यांनी स्वतःचे CSC सेंटर व YouTube चॅनेल सुरू केले, तर २०१८ पासून व्यावसायिक छायाचित्रण क्षेत्रात प्रवेश करून त्यांनी यशस्वी वाटचाल सुरू केली. आज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नावाजलेले फोटोग्राफर म्हणून ओळखले जातात.

यापूर्वीही त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार (२०२४), स्वामी विवेकानंद सोशल रिफॉर्मर पुरस्कार, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रेरणादायी मानवता पुरस्कार, कोकण सन्मान तसेच विविध छायाचित्र स्पर्धांमधील गौरव मिळाला आहे.

ग्रामीण भागातून पुढे येत शारीरिक मर्यादांवर मात करून प्रज्वल यांनी मिळवलेले हे यश नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल वडील विनोद गायकवाड, आई विशाखा गायकवाड, भाऊ प्रणीत गायकवाड, आजी वनिता गायकवाड तसेच मित्रपरिवार आणि देवगड तालुक्यातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!