कणकवलीत तीन ठिकाणी पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार

कणकवलीत तीन ठिकाणी पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत तीन ठिकाणी पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार…*

*२८ एप्रिलला मतदान; ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज..*

*कणकवली ः संजना हळदिवे*

तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीअंतर्गत तळेरे, दारिस्ते व घोणसरी येथे २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज छाननी व माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये कासार्डे प्रभाग २ मधून शितल शेट्ये, कळसुली प्रभाग ३ मधून प्रांजल घाडीगावकर, पिसेकामते प्रभाग ३ मधून देवेंद्र सावंत, हुंबरठ प्रभाग १ मधून मनिषा जाधव, हळवल प्रभाग ३ मधून गौरी परब, तळेरे प्रभाग १ मधून निलम वाडये, तळेरे प्रभाग २ मधून प्राची चव्हाण, डामरे प्रभाग १ मधून भाग्यश्री सावंत, कलमठ प्रभाग ३ मधून मृण्मयी जाधव, आयनल प्रभाग १ मधून अशोक मगम व वारगाव प्रभाग १ मधून महेंद्र केसरकर यांचा समावेश आहे.

दारिस्ते ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण महिला जागेसाठी प्रीती कदम, सिद्धी गुरव व पूजा गुरव यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सिद्धी गुरव यांनी अर्ज मागे घेतल्याने आता प्रीती कदम व पूजा गुरव यांच्यात लढत होणार आहे.

तळेरे ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण जागेसाठी सागर डंबे, उद्धव महाडिक व आदित्य महाडिक यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी उद्धव महाडिक यांनी माघार घेतल्याने सागर डंबे व आदित्य महाडिक यांच्यात सामना रंगणार आहे.

साकेडी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण महिला जागेसाठी ऋतुजा सदडेकर व साक्षी घाडी यांनी अर्ज भरले होते. ऋतुजा सदडेकर यांनी अर्ज मागे घेतल्याने साक्षी घाडी या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

घोणसरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी राजेंद्र राणे, अनंत गुरव व प्रसाद राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी राजेंद्र राणे यांनी अर्ज मागे घेतल्याने अनंत गुरव व प्रसाद राणे यांच्यात थेट लढत होणार आहे.

तालुक्यातील या तीन ठिकाणी २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!