महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मरणार्थ वेंगुर्ल्यात भव्य मानवी देखावा.

महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मरणार्थ वेंगुर्ल्यात भव्य मानवी देखावा.

*कोंकण एक्सप्रेस*

*महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मरणार्थ वेंगुर्ल्यात भव्य मानवी देखावा..*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला येथे आयोजित महा अभिवादन रॅलीत ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रहाचे प्रभावी स्मरण करण्यात आले. 20 मार्च 1927 रोजी महाड चवदार तळे सत्याग्रह घडलेल्या या ऐतिहासिक आंदोलनाला 99 वर्षे पूर्ण होऊन 100 व्या वर्षात पदार्पण होत असताना, विद्यार्थ्यांनी साकारलेला मानवी देखावा विशेष आकर्षण ठरला.

भारतातील समतेसाठीच्या लढ्यात महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या सत्याग्रहातून “आम्हीही माणसे आहोत” हा संदेश संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावी आणि जिवंत असा देखावा साकारून त्या ऐतिहासिक क्षणांचे पुनरुज्जीवन केले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित होत असताना, वेंगुर्ला वसतिगृहाचा हा उपक्रम प्रथमच अशा स्वरूपात राबविण्यात आला असून, यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.

या उपक्रमासाठी वसतिगृहाचे अधीक्षक डॉ. कुणाल इंदलकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच माजी विद्यार्थी ॲड. किशोर खरात व विद्यार्थी प्रतिनिधी कार्तिक दरेकर यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

या अभिनव आणि सामाजिक जाणीव जागवणाऱ्या उपक्रमाचे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून कौतुक होत आहे. समता, न्याय आणि बंधुता यांचा संदेश देणारा हा मानवी देखावा समाजाला आजही प्रेरणा देत असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!