*कोंकण एक्सप्रेस*
*निवडणुकीनंतर आ. निलेश राणेंनी तलवार म्यान केली*
*भूमिकेवर ठाम राहिले नाहीत – वैभव नाईकांचा आरोप*
*कणकवली : प्रतिनिधी*
सुरुवातीला जोरदार आरोप करणारे आ. निलेश राणे यांनी निवडणूक संपल्यानंतर आपली तलवार म्यान केली असून भाजपकडून त्रास होईल या भीतीने ते मवाळ झाले आहेत, असा घणाघाती आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. वातावरण निर्मिती करून निवडणूक जिंकली, मात्र त्यानंतर घेतलेल्या भूमिकेमुळे जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
आ. निलेश राणे यांनी सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र निवडणुकीनंतर त्यांनी शेपूट घातले. भाजप त्रास देईल या भीतीने त्यांनी तलवार म्यान केली आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहिले नाहीत. त्यामुळे आता लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा, हे ठरवावे, असे वैभव नाईक यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.
दरम्यान, ही प्रतिक्रिया उबाठा सेनेचे सोशल मीडिया समन्वयक अमर घाडीगांवकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रसिद्ध केली आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात यावर आ. निलेश राणे काय प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

