*कोकण Express*
*ओसरगाव – २ लाख ६४ हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त; ट्रकसह दोघे ताब्यात!*
*कणकवली पोलिसांची धडक कारवाई!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीररित्या होत असलेली वाहतूक कणकवली पोलिसांनी रोखली आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणारी गोवा बनावटीच्या २ लाख ६४ हजार रुपयांच्या दारुसह ८ लाखाचा ट्रक असा एकूण १० लाख ६४ हजारांचा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी जप्त केला. कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोलनाक्याजवळ १४ जून रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची टीप कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ओसरगाव हायवे टोलनाका येथे कणकवली पोलिसांचे पथक सापळा रचून थांबले होते. संशयित ट्रक ओसरगाव टोलनाक्यावर आला असताना पाहणी केली असता हौद्यात २०० बॉक्समध्ये गोवा बनावटीची २ लाख ६४ हजार किंमतीची दारू आढळून आली. या अवैध दारू वाहतुकप्रकरणी संतोष विठ्ठल शिंगाडे (वय ३५, रा. रानबांबुळी, ता कुडाळ ) आणि अनस इब्राहिम चेअरडीएल (वय ३७, सध्या रा.भटवाडी फेडरल बँक समोर सावंतवाडी, मूळ रा. वेलानागल्लूर जि. त्रिशूर, केरळ ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५ ( अ ), ( ई ) , ८१, ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश गुरव यांनी केली. पुढील तपास एपीआय सागर खंडागळे करत आहेत.

