*कोकण Express*
*सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व भाजपा आमदार नितेश राणे यांनी नुकसानीची केली संयुक्त पहाणी*
*मतदारसंघात आलेल्या मंत्री पाटील यांचे आ. नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यामध्ये चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील व भाजपा आमदार नितेश राणे यांनी नाधवडे येथे नुकसानीची संयुक्त पाहणी केली. दरम्यान मतदारसंघात पहिल्यांदाच दौऱ्यावर आलेल्या मंत्री श्री. पाटील यांचे आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादी व भाजपा कार्यकर्ते एकत्र आल्याने हा निव्वळ योगायोग की पुढील राजकारणाची नांदी. अशी तालुक्यात आज दिवसभर चर्चा होती.
आमदार नितेश राणे हे ठाकरे सरकारवर सर्व बाजूने जोरदार प्रहार करत आहेत. मात्र आज आमदार नितेश राणे यांनी सरकारमधील प्रमुख मंत्र्याचे मतदारसंघात स्वागत करत त्यांच्याबरोबर नुकसानीची पाहणी केली. नाधवडे येथे जि. प. सदस्य सुधीर नकाशे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी मंत्री श्री. पाटील व आ. राणे यांनी भेट देत संयुक्त पाहणी केली.
शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन मंत्री पाटील व आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित साटम, राष्ट्रवादीचे नेते काका कुडाळकर, वैभववाडी भाजपाध्यक्ष नासीर काझी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपा पदाधिकारी जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, बाळा हरयाण, तहसीलदार रामदास झळके, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, पोलिस निरीक्षक अतुल जाधव, बंडूकाका मुंडल्ये, बंड्या मांजरेकर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
