कणकवली नगरपंचायत च्या कोविड केअर सेंटरचे उद्या लोकार्पण

कणकवली नगरपंचायत च्या कोविड केअर सेंटरचे उद्या लोकार्पण

*कोकण  Express*

*कणकवली नगरपंचायत च्या कोविड केअर सेंटरचे उद्या लोकार्पण*

*कणकवली शहरातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना मोफत सेवा*

*जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते होणार लोकार्पण*

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती*

*कणकवली​  ः प्रतिनिधी (संजना हळदिवे)*

नगरपंचायत च्या वतीने तयार करण्यात आलेले कोविड केअर सेंटरचे लोकार्पण  जि प अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते उद्या रविवार 16 मे रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटर च्या माध्यमातून कणकवली शहरातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. या कोविड केअर सेंटर च्या लोकार्पण प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,  मुख्याधिकारी अवधुत तावडे, सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या कोविड केअर सेंटर साठी डॉ. रोहित डगरे व डॉ. रवींद्र बुरुड या दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, तसे आदेश देखील पारित करण्यात आले आहेत. तीन नर्स जिल्हा परिषद मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना औषध पुरवठा हा जि प च्या माध्यमातून पूर्णतः मोफत असणार आहे. 25 बेडच्या या कोविड केअर सेंटर मध्ये नगरपंचायत कडून येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना दोन वेळचे जेवण, चहा नाष्टा व तेथील स्वच्छता ही जबाबदारी नगरपंचायत पाहणार आहे असे नलावडे यांनी सांगितले. कणकवली रोटरी क्लब च्या वतीने एक व तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने एक असे एकूण दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या कोविड केअर सेंटरला मोफत भेट देण्यात येणार आहेत. तर कणकवली विद्यामंदिर च्या 1985 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून कोविड केअर सेंटरला प्रत्येकी एक असे एकूण दोन ऑक्सीजन जंबो सिलेंडर व त्याला आवश्यक असणारे कीट मोफत स्वरूपात पुरविण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये कणकवलीतील कोणत्याही रुग्णाला दाखल व्हायचे झाल्यास किंवा जिल्हा रुग्णालय किंवा जिल्ह्यातील इतर कोणत्याही कोविड केअर सेंटर मध्ये शिफ्ट करायचे झाल्यास त्याकरिता लागणारी रुग्णवाहिका बाळा वळंजू मित्र मंडळामार्फत 24 तास मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रुग्णवाहिकेमार्फत कोविड केअर सेंटर मध्ये दाखल होणे, त्यानंतर अन्यत्र उपचारासाठी शिफ्ट करणे, किंवा कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज मिळाल्यावर त्या रुग्णाला घरी सोडणे हे काम या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही रुग्णवाहिकेची सेवा केवळ जिल्ह्यांतर्गत उपलब्ध असणार आहे. या कोविड केअर सेंटर मध्ये नागरिकांना मनोरंजनासाठी प्रोजेक्टरच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वाय-फायची सुविधा देखील रुग्णांना उपलब्ध असणार आहे. तसेच कणकवली रोटरी क्लबचे संतोष कांबळे यांच्या माध्यमातून प्रोजेक्टर च्या मार्फत येथील रुग्णांना ठराविक वेळेत मोफत योगा मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. या कोविड केअर सेंटरला परवानगी देऊन कणकवली शहरवासीयांच्या दृष्टीने सहकार्य केल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे,प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर जे पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ या सर्वांचे आभार मानले आहेत. कोरोना चे नियम पाळून हा लोकार्पण कार्यक्रम होणार असल्याची माहिती नलावडे यांनी दिली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!