*कोकण Express*
*जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांकडून किनारपट्टी भागाची पाहणी…*
*नागरिकांना केले सतर्कतेचे आवाहन*
*सिंधुदुर्ग (संजना हळदिवे)*
तौत्की चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी तसेच पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी किनारपट्टी भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना आज पासून पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा दिला आहे. ‘तौत्की चक्रीवादळ आपल्या जिल्हात धडकण्याचा इशारा असून आज रात्रीपासून उद्या सकाळी १० पर्यंत हे वादळ आपल्या जिल्ह्यातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन तीन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. ७० ते ८० प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने दिली असल्यामुळे मच्छीमार बांधव, किनारपट्टीवरील लोकांसह सर्वच नागरिकांनी सतर्क राहावे तसेच स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
तसेच पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार नागरीक तसेच जनावरांना सुरक्षितस्थळी हलवण्याची आणि या परिस्थितीत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे सांगितले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक देखील उपस्थित होते.
