दोडामार्ग शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी दीपक केसरकरांची आग्रही मागणी

दोडामार्ग शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी दीपक केसरकरांची आग्रही मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्ग शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी दीपक केसरकरांची आग्रही मागणी*

*सावंतवाडी : संजना हळदिवे*

दोडामार्ग पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील मंजूर आस्थापना व रिक्त कर्मचारी पदांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांची आज मंत्रालयात भेट घेऊन दोडामार्ग शिक्षण विभागासाठी कर्मचारी आस्थापना मंजूर करून रिक्त पदे तात्काळ भरण्याची आग्रही मागणी केली.

दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन अनेक वर्षे झाली असली तरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला आवश्यक कर्मचारी आस्थापना अद्याप शासनाकडून मंजूर झालेली नाही. राज्यातील एकूण ३१ तालुक्यांमध्ये अशाच स्वरूपाचा प्रश्न असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोकणातील दोडामार्ग तालुक्याचा विशेष बाब म्हणून विचार करून स्वतंत्र कर्मचारी आस्थापना मंजूर करावी, अशी मागणी केसरकर यांनी केली.

यापूर्वीही आमदार दीपक केसरकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दोडामार्ग शिक्षण विभागासाठी शिक्षण विस्तार अधिकारी संवर्गातील दोन पदे मंजूर झाली आहेत. त्यामुळे आता उर्वरित आस्थापना मंजूर करून रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. लवकरात लवकर आस्थापना मंजूर करून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

या भेटीवेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना समन्वयक सचिन वालावलकर हे देखील उपस्थित होते.

दोडामार्गच्या शिक्षण विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागल्यास तालुक्यातील शैक्षणिक प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!