*कोंकण एक्सप्रेस*
*जलसंधारण सप्ताह सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीपणे राबवा*
*जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचना; नागरिक व युवकांना सक्रिय सहभागाचे आवाहन*
*सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (जिमाका) :*
१५ ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘जलसंधारण सप्ताह’ प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या. मृद व जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवून जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने विविध उपक्रमांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, उप अभियंता जलसंधारण संतोष शिरोडकर यांच्यासह सर्व कार्यालय प्रमुख ऑनलाइन उपस्थित होते.
जलसंधारण सप्ताहादरम्यान ग्रामीण व शहरी भागात मृद व जलसंधारणाच्या कामांचे भूमिपूजन, लोकार्पण, जलपूजन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, पावसाचे पाणी संकलन, नाला-तलाव-विहीर स्वच्छता आणि वृक्षारोपण यांसारखे उपक्रम राबविण्यात यावेत. शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, पोस्टर, वाद-विवाद स्पर्धा, ‘एक शाळा-एक शोषखड्डा’ उपक्रम, जलमित्र-जलदूत घडविणे तसेच जलसंधारणाची शपथ घेण्यासारखे उपक्रम घेण्यात यावेत.
२२ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिना’निमित्त ‘महा वॉकथॉन–वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार असून, यात नागरिक, युवक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. युवकांच्या सहभागातून ‘Reel for Soil and Water Conservation’ स्पर्धा आयोजित करून माती संवर्धन, पाणी बचत, जलसंधारण, पावसाचे पाणी संकलन, वृक्षारोपण आदी विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.
माती आणि पाणी ही भविष्यातील पिढ्यांसाठी जपण्याची अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून, ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा संदेश जिल्ह्यात व्यापकपणे पोहोचविण्यासाठी नागरिक व युवकांनी जलसंधारण सप्ताहात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. कृषी, ग्रामविकास, महसूल, वन, जलसंपदा, पाणीपुरवठा व स्वच्छता, रोहयो आणि शिक्षण विभागासह सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने हा सप्ताह यशस्वी करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या सप्ताह तसेच अभियानात
#Mahawalkathon
#SaveSoilSaveWater #WalkForWater असे हॅशटॅग वापरण्यात येणार आहेत.

