*कोंकण एक्सप्रेस*
*मुंबई विद्यापीठाच्या ‘युवा महोत्सवा’त मोंडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी*
*वक्तृत्व स्पर्धेत भक्ती पाटणकर हिचे तृतीय क्रमांकाचे यश;अंतिम फेरीत प्रवेश*
*देवगड ः प्रतिनिधी*
मुंबई विद्यापीठांतर्गत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘युवा महोत्सव २०२६’च्या झोनल राऊंडमध्ये मोंड येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री नामदेव मोतीराम माणगावकर कला वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
शनिवारी सावंतवाडी येथे पार पडलेल्या या युवा महोत्सवात ग्रामीण व दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये मोंडच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, पखवाज, पोस्टर मेकिंग आणि मोनो अॅक्टिंग आदी स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपली कलागुणांची छाप उमटवली.
वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयाची कु. भक्ती विठ्ठल पाटणकर (TYBA) हिने तब्बल २४ स्पर्धकांमधून तृतीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे तिची मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
तसेच कु. धीरज कृष्णा गाडी (TYBA) याने पखवाज वादन, कु. दीक्षा गणेश तावडे (FYBA) हिने पोस्टर मेकिंग, कु. भूमी वरद पाटणकर (FYBCOM) हिने वक्तृत्व आणि कु. राजश्री दीपक बांदे (FYBA) हिने मोनो अॅक्टिंगमध्ये सहभाग घेतला.
वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना कु. भक्ती पाटणकर यांना प्रा. अक्षता पाडकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. पखवाज वादनासाठी धीरज गाडी याला परीक्षकांकडून विशेष कौतुक मिळाले. तसेच मोनो अॅक्टिंगमध्ये राजश्री बांदे हिने ‘निर्भया’ या संवेदनशील विषयावर सादरीकरण करून परीक्षकांची दाद मिळवली.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. गणेशजी राणे तसेच सर्व संचालक मंडळ, प्राचार्य व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
भक्ती पाटणकर हिच्या तृतीय क्रमांकाच्या यशामुळे महाविद्यालयाची युवा महोत्सवातील अंतिम फेरीतील वाटचाल निश्चित झाली असून, आगामी अंतिम फेरीतही मोंडच्या विद्यार्थ्यांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

