सावंतवाडी मतदारसंघातील वीज समस्या होणार दूर; ३३ केव्ही वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा मार्ग मोकळा!

सावंतवाडी मतदारसंघातील वीज समस्या होणार दूर; ३३ केव्ही वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा मार्ग मोकळा!

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी मतदारसंघातील वीज समस्या होणार दूर; ३३ केव्ही वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा मार्ग मोकळा!*

*मुंबई*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वारंवार उद्भवणाऱ्या विजेच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ३३ केव्ही वीज वाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महिला व बालविकास राज्यमंत्री मा. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबतचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. सावंतवाडीचे आमदार तथा माजी मंत्री मा. श्री. दीपकभाई केसरकर यांच्या आग्रही मागणीनुसार ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीतील प्रमुख उपस्थिती
एम.एस.आर.डी.सी. कार्यालयातील (निर्मल भवन, मुंबई) सभागृहात झालेल्या या बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री मा. ना. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, आमदार मा. श्री. दीपक केसरकर यांच्यासह महावितरण व महापारेषणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), विविध संचालक, तसेच रत्नागिरी व कराडचे मुख्य अभियंता, सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता आणि महावितरणचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भूमिगत वाहिनीची गरज का?
दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला परिसरातील अधिकाधिक भाग हा जंगल आणि झाडाझुडपांनी युक्त आहे. पावसाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडणे, सोसाट्याचा वारा व वादळामुळे फांद्या तुटून विद्युत तारांवर पडणे यामुळे विजेच्या तारांचे व पोलचे मोठे नुकसान होते. परिणामी, वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. या समस्येवर मात करण्यासाठी आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ३३ केव्ही वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी आमदार दीपक केसरकर यांनी लावून धरली होती.
तातडीने सर्व्हे करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ३३ केव्ही विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला वेग देण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले. तसेच, या कामाचा तात्काळ सर्व्हे करून मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे भविष्यात सावंतवाडी मतदारसंघातील वीज पुरवठा अधिक अखंडित व भरवशाचा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!